वंजारवाडी येथे श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहन सोहळा उत्साहात संपन्न.
किनवट (प्रतिनिधी)
किनवट येथून पुर्वेस सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे वंजारवाडी येथे नूतन मंदिर बांधकाम पूर्ण झाले असून श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
ह.म.प. नारायण महाराज वैष्णव सदन माधापुरकर यांच्या प्रेरणेने गावकऱ्यांनी स्वखर्चातून मेहनत व चिकाटीने भव्यदिव्य असे श्री हनुमान मंदिर उभे केले. येथील मंदिरात श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण चा कार्यक्रम दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी ह.भ.प. बालयोगी श्री गंगेश्वर महाराज सोमेश्वर संस्थान मदनापूर, शनिवार पेठ यांच्या शुभहस्ते हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सकाळी अकरा वाजून एकवीस मिनिटांनी संपन्न झाला.
तत्पूर्वी सकाळी सात वाजता कळस नगर प्रदक्षिणा व दिंडी मिरवणूक काढण्यात आली होती.या महोत्सवासाठी गावातील लेकबाळींनी मोलाचे योगदान दिले, म्हणून गावकऱ्यांच्या वतीने या सर्व लेकबाळींचा भेटवस्तू देऊन येथोचीत्त सत्कार करण्यात आला.लेकबाळींचे योगदान व सत्कार याचे संपूर्ण नियोजन गावातील दत्ता गोविंदराव केंद्रे यांनी केले होते. सदर कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उत्स्फूर्तपणे पार पडलेल्या या सोहळ्याचा लाभ पंचक्रोशातील भाविक भक्त तसेच महिलांनी घेतला.
सध्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे याचा आरंभ २१/१२/ २०२४ रोजी झाला आणि २८/१२/२०२४ रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगत होईल. गावकऱ्यांनी मोठ्या चिकाटी व मेहनतीने हे मंदिर उभारले असून यामध्ये शंकर जायभाये, सूर्यकांत गुट्टे, परमेश्वर जायभाये ,बाबुराव गुट्टे, ज्ञानदेव मुंडे, माधव चाटे, पुंडलिक घुगे, रामदास गुट्टे, बालाजी जायभाये, केशव केंद्रे , हरिचंद्र जायभाये , उध्दव गुट्टे,सुधाकर अनंतवार सह संपूर्ण गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.