कोवीड कायद्याचे उलंघन करुन बोधडी बु. येथिल सोमवारचा आठवडी बाजार थाटला;जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर प्रकरणाची दखल घेऊन कार्यवाही करावी-मागणी
किनवट/प्रतिनिधी— कोरोनाच्या दुस-या लाटेची तीव्रता अद्यापही कायम असतांना सुद्धा कोवीड कायद्याचे उलंघन करुन बोधडी बु. येथिल आज सोमवारचा आठवडी बाजार थाटण्यात आला. सुजान नागरीकांनी तहसिलदारांसह ग्रामविकास अधिका-यांना सांगूनही प्रशासनाला तीळमात्र घाम सुटलेला नाही. बोधडी परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढल्यास लोकांच्या जीविताशी खेळणा-या प्रशासनातील सर्वांनाच जबाबदार धरुन त्यांच्या विरुद्ध कोवीड १९ कायद्यान्वये कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आठवडी बाजार बंदसह सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी ७ ते ११ पर्यंत दुकाने चालू ठेवावीत. शनिवार व रविवार दोन दिवस कटाक्षाने बंद पाळावा. अंत्यविधी, लग्न समारंभाला तोकडी संख्या, शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन केवळ शिस्तप्रीय नागरीकांनीच करायचे काय ? इत्तरांनी मात्र मनमुरादपणे कायद्याचे उलंघन करायचे ? असा सवाल या निमित्ताने व्यक्तविला जात आहे. १० मे (सोमवारी) रोजी बोधडी बु. येथे आठवडी बाजार भरवण्यात आला. बाजारु दुकानांसह बाजारक-यांची चिक्कार गर्दी दिसून आली. या गर्दीत वर्दीधारी पोलीस यंत्रणा दिसून आली नाही. ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कोवीड यंत्रनेतील कोणीही जबाबदार घटक कल्पना देऊनही बाजार बंद करण्यासाठी फिरकला नाही. बोधडी परिसरातील सुहास मुंडे यांच्यासह अनेकांनी तहसिलदारांसह अनेक संबंधितांना कळऊनही सर्रास आठवडी बाजार चालूच राहिल्याने आठवडी बाजाराला मुभा देण्यात आली की काय ? ते सहायक जिल्हाधिकारी पुजार व तहसिलदार कागणे यांनी एकदा जाहीर करावे असे त्यांचे म्हणने आहे.
बोधडी येथिल आठवडी बाजारात सभोवतालच्या चाळीस गावांचा संपर्क असतो. या चिक्कार गर्दीत दहा-पाच कोरोना बाधितांचा कदाचित संपर्क आला तर त्याचे काय परिणाम उद्भवतील याची कल्पना यंत्रणेला नाही काय ?. कोरोनाच्या दुस-या लाटे दरम्यान याही परिसरात अनेकांना चटके आणि झटके बसलेले असतांना प्रशासनाची अशी बेफिकीरी म्हणजे महामारी संसर्गाला खतपाणी घालण्याचा प्रकार नव्हे काय ?, भविष्यात जर रुग्णवाढ झालीच तर याची सर्वस्वी जिम्मेदारी संबंधित यंत्रणेतील बेजबाबदार अधिकारी व कर्मचा-यांवर सोपवण्यात यावी, अशी मागणी लाऊन धरण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डाॅ.इटनकर यांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी यासाठी नागरीकांनी त्यांच्याशी संपर्क केला असल्याचे सांगितले.