भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षेसाठी मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी द्यावी विद्यार्थ्यांना प्रेरणा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 🔸विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासह परीक्षा केंद्राच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन दक्ष 🔸जिल्ह्यातील परीक्षा केंद्र संचालक व परीक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण
नांदेड (जिमाका) दि. 11 :- दहावी व बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 या महिन्यात घेतल्या जात आहेत. नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी कॉपीमुक्त अभियान राबवून विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास दिला. कोविड नंतरच्या कालावधीत विद्यार्थी हे एक वेगळी अनुभुती घेऊन परीक्षांना समोर जात आहेत. अशा स्थितीत त्यांचे मनोबल वाढावे, आत्मविश्वास वाढवा यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभ्यासक्रमाची अधिक सोपी उकल करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले पाहिजे. याचबरोबर सराव परीक्षांवर भर देऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास दिला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांने केले.
जिल्हा नियोजन भवन येथे या परीक्षांच्या नियोजनासाठी सर्व परीक्षा केंद्रसंचालक यांच्यासाठी विशेष परिसंवाद घेण्यात आला. त्यात ते बोलत होते. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर व विभाग प्रमुख उपस्थित होते.
सर्वच विद्यार्थी परीक्षेसाठी सुरूवातीपासून मेहनत करीत असतात. त्यांना जे काही अवघड जात असते ते शिक्षकांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. एका अर्थाने परीक्षा या आपण केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन असते हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अधिक सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
परीक्षा केंद्र ही विद्यार्थ्यांना आपली वाटावीत यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर येणाऱ्या विद्यार्थ्यांचे चॉकलेट देऊन स्वागत करण्यात येईल. या छोट्या कृतीतून प्रत्येक परीक्षार्थींच्या मनात सकारात्मक भाव निर्माण होण्यासमवेत परीक्षा केंद्राबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी निर्माण होईल, अशी भावना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसंदर्भात कॉपी व इतर कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट करून त्यांनी संस्थाचालकांनाही सावध केले.
नांदेड जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेसाठी 92 परीक्षा केंद्र देण्यात आले असून एकुण 39 हजार 645 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होऊन 21 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा जिल्ह्यातील एकुण 45 हजार 468 विद्यार्थी देणार असून त्यासाठी 160 परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. ही परीक्षा 2 मार्च पासून 25 मार्च 2023 या कालावधी पर्यंत होईल.
00000