*शेतकऱ्यांच्या विज कनेक्शन तोडल्यास रस्त्यावर उतरु-आ.वसंतराव चव्हाण*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:ऐन रब्बीच्या हंगामात महावितरण कडून विज बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावल्याने शेतकऱ्यात संताप
व्यक्त करण्यात येत आहे.
महावितरणची अशीच हेकेखोरी चालू राहील्यास शेतकऱ्यांना घेवून रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी दिला आहे.
अगोदरच अधिभाराच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना लुटण्यात येत असल्याने महावितरणच्या विरोधात संतापाचे वातावरण असतांना आता विजबिल वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडण्याची मोहीम नायगाव मतदारसंघात सुरु आहे.
अतिवृष्टीमुळे खरिप हंगाम हातातून गेला असून रब्बीवर शेतकरी अवलंबून असताना महावितरणचे अधिकारी विज कनेक्शन तोडून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.महावितरणच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी वैतागले असल्याने माजी आमदार वसंतराव चव्हाण शेतकऱ्यांच्या बाजूने मैदानात उतरून महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशाराच दिला आहे.
एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणतात शेतकऱ्यांची लाखो एकर जमीन सिंचनाखाली आनणार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात शेतकऱ्यांच्या विज-जोडण्या तोडू नये असे निर्देश संबधीत विद्युत कंपनीच्या अधिकारी वर्गांना दिले आहेत.
तरीही महावितरणचे अधिकारी विज कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवत आहेत.महावितरणची ही दादागिरी खपवून घेणार नाही.राज्याच्या प्रमुखांनी दिलेले आदेश न-पाळता विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी,कर्मचारी मुजोरपणे वागत असून. गावो-गावी जावून विज-जोडणी तोडत आहेत.
खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे गेला आणि रब्बी हंगाम महावितरणमुळे वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. विज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने उगवलेली कोवळी कोंब सुकून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परीणामी शेतकऱ्यांत उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे महावितरणच्या दादागिरीच्या रस्त्यांवर ऊतरु असा थेट इशारा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी दिला आहे.