आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना विनाकारण कमी केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दत धरणे आंदोलन
नांदेड :- (मारोती शिकारे) कोराना काळात शासकीय कोविड सेंटर मध्ये काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना कुठलीही पूर्व सुचना न देता विनाकारण कामावरूण काढून टाकल्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर प्रचंड घोषणाबाजी करीत शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुद्दत धरणे आंदोलन सुरू केले असून आंदोलनाचे नेतृत्व डीवायएफआयचे जिल्हा अध्यक्ष कॉ.अंकुश माचेवाड युएनएचे जिल्हा अध्यक्ष आदि बनसोडे आणि सीआयटीयुचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड व जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार करीत आहेत.
या आंदोलनात प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोशीकर यांनी कर्मचाऱ्यां बाबत सहानुभूती दाखविण्या ऐवजी कर्मचाऱ्यांना विनाकारण कमी करण्याची कारवाई केली असल्याचा आरोप करीत त्यांच्या व मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. कोविड – १९ चा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यातील मृत्यू दर वाढ ही देशात लक्षवेधी ठरली होती तेव्हा परिचारीका,वार्डबॉय,डॉक्टर,लॕब टेक्निशियन,डीईओ,फार्माशिस्ट व इतर कर्मचाऱ्यांना कंत्राटी स्वरूपात आरोग्य विभागात सामावून घेतले होते. त्यांना तीन महिन्याचा आदेश देण्यात आला होता परंतु कोरानाचा प्रादुर्भाव कमी होताच सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतला असून कर्मचाऱ्यांचे वेतन देखील थकीत आहे.तसेच इतर खाजगी दवाखान्यात या आरोग्य कर्मचाऱ्यांना काम न देण्याची भूमिका काही खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापनाने घेतली असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या सोबत शिष्ठमंडळाची बैठक झाली असून स्थानिक मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होते परंतु जिल्हा प्रशासनाने लेखी पत्र दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही व चालूच राहील अशी भूमिका काही आंदोलकांनी घेतली असल्यामुळे तुर्तासतरी आंदोलन चालूच राहील अशी परिस्थिती आहे.जिल्ह्यातील खाजगी रूग्णालयात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना किमान व समान वेतन लागू करावे.बोगस कारभार करणाऱ्या रूग्णालयावर कठोर कारवाई करावी.खाजगी रूग्णालयातील सर्व कामगार कर्मचाऱ्यांना पिएफ लागू करावा या प्रमुख मागण्यासह इतर मागण्याही निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे जिल्हाधिकारी,नांदेड मार्फत करण्यात आल्या आहेत.
आंदोलनामध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने सामील झाले होते.आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनिषा भवरे,वैशाली वायदळे,स्वप्नाली जोंधळे,सुरेखा वैद्य आदिंनी परिश्रम घेतले असून वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनास पाठिंबा दिला.
—————————————-