साने गुरूजी रूग्णालयाच्या जनजागृती व समुपदेशन कार्यक्रमात प्रशासनातील सर्व घटकांचा समावेश राहील- सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे
किनवट : करोनाच्या संकटातुन सावरण्याकरीता समाजाचे समुपदेशन आवश्यक असुन भारत जोडो युवा अकादमीच्या साने गुरूजी रूग्णालयाच्या जनजागृती व समुपदेशन कार्यक्रमात प्रशासनातील सर्व घटकांचा समावेश राहील असे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे यांनी सांगितले.
शुक्रवार (दि. 04 ) रोजी भारत जोडो युवा अकादमीच्या साने गुरूजी रूग्णालय व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या करोना (कोवीड -19) जनजागृती व समुपदेशन कार्यक्रमाच्या सल्लागार समितीच्या बैठकीच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते.
सल्लागार समितीचे उपाध्यक्ष उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, प्रभारी तहसिलदार अनिता कोलगणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, किनवटचे गट विकास अधिकारी सुभाष धनवे, माहूरचे गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, जनजागृती प्रकल्प संचालक डॉ. अशोक बेलखोडे हे या प्रसंगी उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री. पुजार म्हणाले, करोना महामारीच्या जागतीक संकटाने समस्त मानव समाजाला संकटात टाकले असुन यामुळे अनेक परिवारांवर मोठी आपत्ती आली आहे. अनेकांनी जीव गमावल्यामुळे त्या पश्चात परिवारातील लहान मुले, वृध्द व इतर सदस्य मानसीक तणावात जगत आहेत. त्यासोबतच कोवीड -19 च्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे समाजातील सर्व घटकांनी काटेकोरपणे पालन करावे तरच या संकटाचा सामना करता येणार आहे.
या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी भारत जोडो युवा अकादमी या संस्थेने पुढाकार घेतला असुन डॉ. विश्वनाथ रामाणी यांचे सहायाने कमल उदवाडीया फाऊंडेशन, मुंबई या दानशूर संस्थेच्या मदतीने किनवट व माहूर तालुक्यात करोना आपत्ती समुपदेशन व जनजागरण अभियान राबविण्यात आहे. हे अभियान प्रभावीपणे सुरू रहावे यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने सहभाग घेतला असुन त्यासाठी दोन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांची सल्लागार समिती गठीत करण्यात आलेली आहे. आज या समितीची औपचारीक बैठक सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच.पुजार, भाप्रसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
विश्व विख्यात मानसोपचार समुपदेशक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या इंस्टीट्युट ऑफ सायकॅट्रीक्ट हेल्थ या संस्थेच्या मदतीने विशेष प्रशिक्षण घेतलेल्या समुपदेशकांची टीम यासाठी कार्यरत राहणार असुन जनजागृती करण्यासाठी गावोगावी ध्वनीक्षेपकाद्वारे विशेष वाहन, यात प्रबोधन गिते, पत्रकांचे वाटप, व कोरोना काळातील समस्यां जाणून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्रशासनातील महसूल, आरोग्य, पोलिस, शिक्षण, महिला व बालविकास, सामाजिक संस्था, सरपंच संघटना, राष्ट्रीय सेवा योजना व महिला बचत गट यांचा सहभाग घेण्यात येणार असुन यामुळे हे अभियान अधिक प्रभावी होणार असल्याचे प्रास्ताविकात प्रकल्प संचालक डॉ. बेलखोडे यांनी सांगितले
ज्या गावात कमी लसीकरण झाले त्या गावात लसीकरणाबाबत जनजागृती अधिक प्रभावीपणे करण्यात यावी, करोना संदर्भातील परसविण्यात येणाऱे भ्रम दूर करण्यात यावे, ग्राम पातळीवर विलगीकरण कक्ष अधिक चांगल्या प्रकारे सुरू राहतील याकडे लक्ष देणे, पहिली लस घेणाऱ्यांनी दुसरी लस घ्यावी या बाबत जनजागृती करणे, कोविड -19 संदर्भात निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत जनजागृती करण्यात यावी, ज्या कुटुंबातील सदस्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला असेल त्या कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन करणे आदि उपाययोजना करण्याचे या प्रसंगी ठरविण्यात आले
या बैठकीस सल्लागार समिती सदस्य पत्रकार ऍड. मिलिंद सर्पे, प्रदिप वाकोडीकर, गोकुळ भवरे, बचत गट प्रेरक संगिता पाटील, यांच्यासह महिला बालविकास विभागाचे आगळे, माहूर वैद्यकीय विभागाचे गावंडे, माहूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे मुसने उपस्थित होते. जनजागरण कार्यक्रमाचे या प्रसंगी उद्घाटन करण्यात आले.
प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे यांनी सुत्रसंचालन केले. प्रकल्प समन्वयक बालाजी गाडगे यांनी आभार मानले.