मका, ज्वारी खरेदी दोन दिवसात सुरू करा – खा. हेमंत पाटील
- अन्न नागरी पुरवठा व वित्त विभागाच्या सचिवांची घेतली भेट
किनवट : आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत किनवट तालुक्यातील भरडधान्य मका आणि ज्वारी खरेदी येत्या दोन दिवसात सुरु करण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील आणि राज्याच्या वित्त विभागाचे सचिव राजीव कुमार मित्तल व अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सोनिक यांची भेट घेऊन केली . तातडीने या मागणीची दखल घेवून हे खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देश संबंधितांना सचिवांनी दिले असून, लवकरच खरेदी केंद्राला सुरवात होणार आहे .
आधारभूत पणन २०२०-२१ अंतर्गत आदिवासी विकास महामंडळाने भरडधान्य खरेदी करण्यासाठी ज्वारी व मका उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार किनवट तालुका आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यानी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी केली . दरवर्षी मे महिन्यात भरडधान्य खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्याचा मला खरेदी केला जातो , परंतु यंदा मे महिना उलटून गेला तरी खरेदी सुरु करण्यात आली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता . शेतकरी आपलया घरातच माल ठेवून खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा करत होते . किनवट, माहूर हे आदिवासी बहुल तालुके असून याभागातील खरेदी केंद्र सुरु करावेत याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी गतवर्षी सुद्धा केंद्र आणि राज्यस्तरावर पाठपुरावा करून ,केंद्र सुरु करून घेतले होते व तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला होता . शासनाच्या धोरणानुसार याभागातील शेतकरी दरवर्षी मक्याचे उत्पादन घेत असतात . यंदाच्या हंगामात सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी सुरवातीला खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी मागणी करून मान्यता मिळवून आणली होती . अन्न नगरी पुरवठा विभागाने यास परवानगी सुद्धा दिली होती. परंतु प्रत्यक्षात खरेदीला सुरवात न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे आल्यानंतर मुंबई येथे मंत्रालयात अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव यांची यासंदर्भाने भेट घेतली. यावेळी खासदार हेमंत पाटील म्हणाले की अगोदरच कोरोनामुळे शेतमालाला भाव मिळत नसून त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.म्हणूनच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या भागातील खरेदी केंद्र सुरू करावेत .सचिवांनी तातडीने या मागणीची दखल घेऊन खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. लवकरच मका आणि ज्वारी खरेदी सुरु होऊन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल असे सचिव विलास पाटील यांनी सांगितले.खासदार हेमंत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केल्यामुळे प्रलंबित कामाला गती मिळणार आहे .