अलका व राजीव गुल्हाणे वयोवृद्ध पती पत्नीचे महापालिके समोर अमरण उपोषण सुरू ;जमिनीचा ऊर्वरीत मोबदला द्यावा अन्यथा माझे प्रेत घेऊन येथून पाठवावे: जमीन मालक अलका गुल्हाणे
नांदेड : दि.२४ फेब्रुवारी सकाळी ११.०० वाजता पासून जमीन मालक पती पत्नी अलका व राजीव यांनी महापालिकेसमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.
गुल्हाणे यांची महापालिकेच्या हद्दीमध्ये सर्वे नं.५६ बी येथे ४० आर जमीन आहे.त्यांची कसलीही परवानगी न घेता महापालिकेने त्यांच्या जमिनीवर २९ आर जागेचा वापर करून मलनिसारन केंद्र बांधलेले आहे.
त्यांनी अनेक तक्रारी देऊन पाठपुरावा करीत नांदेड महापालिकेवर खेटे मारले आहेत.तेव्हा सन २०२० मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व महापालिका आयुक्त लहूराज माळी यांनी त्या जमिनीच्या चार मोजण्या करून त्यांचे प्रकरण निकाली काढून त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्याचे आदेश दिलेले आहेत.त्या अनुषंगाने विद्यमान आयुक्त डॉ.सुनिल लहाणे यांनी गुल्हाणे यांना सन २०२१ मध्ये अग्रीम रक्कम स्वरूपात रूपये वीस लक्ष त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करून त्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे.परंतु सौ.गुल्हाणे यांच्या नावाने असलेल्या २९ आर जमिनीचे भू संपादन कायदा २०१३ नुसार मूल्यांकण साधारणतः सहा कोटी रूपये होत असल्याने काही अधिकारी व लोकप्रतिनीधींची निय्यत बदलली असल्यामुळे त्यांना मावेजा मिळू नये यासाठी अनेक यंत्रणा कामाला लागल्या आहेत असे गुल्हाणे दांपत्यांचे मत आहे.मनपाने एक पत्र काढून गुल्हाणेंच्या जमिनीच्या अनुषंगाने एक दावा मा.नांदेड न्यायालयात दाखल असल्याचे स्पष्ट केले आहे.गुल्हाणे यांनी सन १९८९ मध्ये जमीन खरेदी केली असून मोबदला देण्यात येणाऱ्या ऐनवेळी सन २०२० मध्ये त्यांच्या विरोधात दावा दाखल करण्यात आला आहे.अलका गुल्हाणे यांना त्यांचा देय मोबदला देण्यात येऊ नये असे कोणत्याही न्यायालयाने आदेशित केले नसताना मोबदला देण्याचे टाळाटाळ करणे महापालिकेचे चुकीचे आहे.नैसर्गिक न्यायाचा विचार केला तर गुल्हाणे यांना मोबदला म्हणून वीस लाख रूपये कसे काय देण्यात आले ? तत्कालीन जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त भा.प्र.से.यांनी दिलेले आदेश खोटे आहेत काय ? तालुका व जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयाने प्रकरण निकाली काढण्या पूर्वी केलेल्या चार मोजण्या सर्वच्या सर्व खोट्या कशा ठरू शकतात असे अनेक संशय येण्यासारखे प्रश्न येथे निर्माण होत आहेत.चार महिन्यापूर्वी गुल्हाणे पती पत्नीने विभागीय महसूल आयुक्त औरंगाबाद यांची प्रत्यक्षात भेट घेऊन सर्व हकिगत त्यांना सांगितलेली असल्याने आणि ते येथील अधिकाऱ्यांवर रागावल्यामुळे जाणीवपूर्वक आमचा मोबदला देण्यासाठी अडचणी निर्माण केल्या जात आहेत असे गुल्हाणे यांनी स्पष्ट केले आहे.
गुल्हाणे दांपत्यांच्या रास्त मागण्या असल्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज महापालिके समोर सीटू व जनवादी महिला संघटनांच्या शेकडो महिलांनी दिवसभर थांबून पाठिंबा दिला आहे.
अलका गुल्हाणे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्या म्हणाल्या की, महापालिकेने एकतर माझा ऊर्वरीत मावेजा द्यावा किंवा माझी महापालिके समोरून प्रेत यात्रा पाठवावी. उपोषणाच्या नोटीस मध्ये देखील त्यांनी उपोषण असाह्य झाल्यास टोकाचा निर्णय घेणार असल्याचे नमूद केले आहे.निवेदनाच्या प्रति राज्य व केंद्र सरकारच्या अनेक वरिष्ठांना त्यांनी पाठविल्या आहेत.