ब्रेकडाऊन च्या नावाखाली मनमानी कारभार; शेतकरी, व्यापारी, नागरिक विजेच्या लपंडावामुळे वैतागले
किनवट/प्रतिनिधी – येथील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारला जनता वैतागली असून मागील दोन महिन्यापासून सतत रात्रंदिवस वीज पुरवठा खंडित करून नागरिकांना त्रासून सोडले आहे. ब्रेकडाऊन च्या नावाखाली मनमानी कारभार चालविला आहे. शेतकरी, व्यापारी, नागरिक विजेच्या लपंडावामुळे वैतागले आहेत. विजेची सेवा तर देतच नाही उलट वीज बील सक्तीच्या वसुली कारवाईचे आदेश काढत असतील तर आता नागरिकांनी वीज बिल न भरण्याचा विडा उचलल्याचे चित्र पहावयास मिळणार आहे.
एकीकडे नागरिक व्यापारी, शेतकरी, मजूर वर्ग कोरोना च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्षापासून वैतागले असताना आता कुठे व्यवसाय सुरळीत होण्याच्या मार्गावर येत असून येथील लहानसहान व्यापारी मजूर वर्ग आर्थिक संकटात सापडून यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतानाच येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सक्तीच्या वसुली कारवाईचे आदेश काढत आपल्या भोंगळ कारभाराचा आरसा जनतेसमोर ठेवला आहे.
मागील दोन वर्षापासून सतत वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देत आहेत वारंवार विजेचे तारे तुटने, पोल ढासळणे, डीपी जळणे अशा या नात्या कारणा, मीमांसा दाखवून वेळ न काळ केव्हाही विज तासन्तास खंडित करीत आहेत. वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे व्यापारी, शेतकरीसह लहान सहान उद्योग चालकांवर आर्थिक संकट येऊन त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
एकीकडे वीज वितरण कंपनी वीज पुरवठा न करताच नागरिकांना वेठीस धरून आता सक्तीची वीज बिल वसुली च्या बैठका घेत आहे ही बातमी नागरिकात पसरली असून आता नागरिकांनी जोपर्यंत विद्युतपुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत वीज बिल न भरण्याचा निर्धार केला आहे जर वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुलीसाठी सक्ती केल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे याचा परिणाम वीज वितरण कार्यालयाच्या विरोधात जन आंदोलन उभारले जाऊ शकते ते वीज वितरण कंपनीला परवडणारे नाही असेही वीज ग्राहकांकडून बोलल्या जात आहे.