मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषणाचा पाचवा दिवस अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांचे राजीनामे
किनवट (तालुका प्रतिनिधी) : आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ किनवट येथील जिजामाता चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज पाचवा दिवस असून पाचव्या दिवशी तालुक्यातील घोटी येथील मराठा समाजातील महिला पुरुष आपल्या मुलाबाळासह या उपोषणात सहभागी झाले आहेत. दरम्यान मराठा आरक्षणावरून राजीनामा सत्र सुरु असून आज शिवसेना( उबाठा) गटाचे तालुका प्रमुख मारोती दिवसे पाटील, राकॉचे युवक जिल्हा संघटक राजू सुरोसे, शिंदे गटाचे युवा तालुका प्रमुख अजय कदम पाटील यांनी पदाचा राजीनामा देऊन उपोषणात सहभाग नोंदविला आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधव आक्रमक झाला असून किनवट तालुक्यातील सकल मराठा समाज मागील ५ दिवसापासून बेमुदत साखळी उपोषणाला बसून आहे. आज ५ व्या दिवशी अमरदिप कदम , गोविंद अरसोड , प्रकाश गोरे हे अमरण उपोषणास बसले आसून घोटी येथील मराठा समाजातील शेकडो महिला व पुरुष आपल्या मुलाबाळासह साखळी उपोषणाला बसले आहेत. आतापर्यंत राजगड,लोणी झेंडीगुडा, गणेशपुर या गावातील मराठा बांधव उपोषणाला बसले होते दर दिवशी एक गाव याप्रमाणे या साखळी उपोषणाचे नियोजन करण्यात आले असून उपोषणादरम्यान आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार किनवट तालुक्यातील बहुतांश गावात राजकीय पक्षाच्या पुढार्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली तर वेगवेगळ्या पक्षातील मराठा बांधव आपल्या पदाचा स्वयस्फूर्तीने राजीनामा देऊन या साखळी उपोषणात सहभाग नोंदवित आहेत.यापूर्वी भाजपाचे शक्ती केंद्रप्रमुख बबन वानखेडे, राष्ट्रवादीचे अमरदीप कदम, अनिल पाटील कराळे, शिवसेनेचे माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील, भाजपाचे युवक तालुकाध्यक्ष उमाकांत कराळे पाटील, भाजपाचे शक्ती केंद्रप्रमुख शाम मगर व विनायक गव्हाणे पाटील आदिनी पदाचे राजीनामे दिले आहेत .आरक्षणाच्या मागणी संदर्भात जरांगे पाटील यांनी सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली मात्र सरकारकडून अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघाला नसल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उपोषणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून जिजामाता चौक ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरील वाहतूक बॅरिकेट लावून बंद करण्यात आली आहे.
सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत किनवट येथील साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने केला आहे.