सीटूच्या झेंड्याखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन (माकपच्या आमदार, खासदारा मार्फत राज्य व केंद्रात पाठपुरावा करणार -कॉ. गंगाधर गायकवाड)
नांदेड : राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कर्मचारी यांच्या मागण्या आणि बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्या मंदिर गांधीनगर नांदेड तसेच मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या खुल्या मैदानावरील संचालकांच्या मुलीच्या अवैध बांधकामावर कारवाई करावी म्हणून दिनांक 17 नोव्हेंबर रोज गुरुवार वेळ सकाळी 11:30 वाजता पासून वेगवेगळी तीन उपोषणे आणि धरणे आंदोलन सीटू कामगार संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील 36 कर्मचाऱ्यांना 61 महिन्यापासून पगार तथा मानधन देण्यात आले नसून ते देण्यात यावे. श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी देशातील सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून प्रकल्पातील सर्व कर्मचाऱ्यांच्या थकित मानधनाचे विवरणपत्र दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पूर्वी पाठविण्याचे लेखी कळविले आहे परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकल्प कार्यालयाने अचूक अहवाल अद्याप पाठविला नसल्यामुळे सर्व कर्मचारी पगारा पासून वंचित राहिल्यामुळे अडचणीत आले आहेत. अहवाल पाठविण्यास विलंब करणाऱ्या व चुकीचा अहवाल पाठविणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदा 2005 नुसार कारवाई करावी आदी मागण्या घेऊन बालकामगार प्रकल्पाचे अनेक महिला व पुरुष कर्मचारी सीटूच्या झेंड्याखाली साखळी उपोषणास बसून धरणे आंदोलन करीत आहेत.
नांदेड शहरातील बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्यामंदिर या शाळेच्या विरोधात दिनांक 28 जुलै 2022 पासून अखंड धरणे आंदोलन जिल्हा परिषद नांदेड येथे सुरू असून शिक्षणाधिकारी प्राथमिक व गटशिक्षणाधिकारी पं.स नांदेड यांनी शाळा व्यवस्थापनाकडून चिरीमिरी घेऊन शाळा वाचविण्याचा प्रयत्न चालविला असल्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी उपोषणार्थी शिक्षिका अशा महादेव गायकवाड यांनी केली मागील सुनावणी मध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका,संचालक व एक वकील म्हणून आलेल्या व्यक्तींनी आशा गायकवाड यांनी राजीनामा दिला असल्याचे सादरीकरण करीत खोटी सही वापरून बनावट राजीनामा स्वीकारला असून हे षडयंत्र गट क्षणाधिकारी, व इतरांनी रचले आहे. त्या सर्वांनवर कलम 420 नुसार गुन्हे दाखल करावेत. ह्या मागण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. डीवायएफआय चे निमंत्रक व कॉ.जयराज गायकवाड हे महापालिकेसमोर उपोषणास बसले असून गांधीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या ओपन स्पेस खुल्या मैदानावर प्रजा बालक विद्यामंदिर शाळेच्या संचालकाच्या जावयाने घरकुलासाठी शासनाचे पैसे उचलून आलिशान बंगला बांधला आहे ते अतिक्रमण काढावे ही मागणी केली आहे. ऋषिकेश केशव धोंगडे यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले असून बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्यामंदिर शाळेवर कारवाई न करण्यासाठी चिरीमिरी घेणाऱ्या शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी नांदेड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सीटूच्या जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.प्रभाकर पांचाळ, कॉ.आनंदा हनवते, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.मारुती केंद्रे, कॉ.गंगाधर खूणे, कॉ.शामराव वाघमारे, कॉ.सुभाष चंद्र गजभारे, कॉ.रतनबाई गायकवाड,कॉ.गंगासागर गायकवाड, कौशाबाई वाघमारे, अंजनाबाई गायकवाड,गोपी प्रसाद गायकवाड, शशिकला उमरे आदिजन करीत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत साखळी उपोषण व धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदार व खासदारा मार्फत या प्रकरणात राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी लेखी स्वरूपात कळविले आहे.