मांडवी, इस्लापुर बोधडी शहरास तालुक्याचा दर्जा देऊन किनवट जिल्हा करा- तालुक्यातील नागरिकांची मागणी
किनवट : आदिवासीं बहुल किनवट तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा देऊन मांडवी, इस्लापुर बोधडी या शहरास तालुक्याचा दर्जा द्या व यात माहूर, हिमायतनगर तालुक्याचा समावेश करून किनवट जिल्हा निर्मिती करण्याची मागणी किनवट व माहूर तालुक्यांतील प्रतिष्ठित नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदनाद्वारे केली आहे.
किनवट माहूर तालुका व मांडवी, बोधडी, इस्लापूर, ही शहरे नांदेड जिल्ह्यात येतात. नांदेड जिल्ह्याचे एकूण 16 तालुक्यापेक्षा किनवट-माहूर तालुक्याचे क्षेत्रफळ जास्त आहे. किनवट पासून अप्पारावपेठ तेलंगाना ची सीमा 70 किमी, माहूर 57 किमी, पिंपळशेंडा 55 किमी अंतर आहे. पिंपलशेंडा ते नांदेडचे अंतर 205 किमी आहे. मांडवी, माहूर, किनवट, आप्पारावपेठ, बोधडी, इस्लापूर या भागातील जनतेस कोर्ट कचेरी, शासकीय कामानिमित्त नांदेड जिल्ह्यास जावे लागते. यासाठी जाण्या येण्यासाठी एका व्यक्तीस 500 रुपये खर्च येतो या भागातील लोक आदिवासी व गोरगरीब आहेत. शेती कोरडवाहू असून शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून या भागात सतत नापीकी होत आहे. या भागातील जनता अधिकतम आदिवासी मागासवर्गीय आहेत. त्यामुळे गरीब जनतेला नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. पूर्वी अप्पारावपेठ, इस्लापूर, मांडवी, माहूर, किनवट हा भाग तेलंगाना राज्यात होता 1960 नंतर हा भाग महाराष्ट्रात आला. परंतु अजूनही या भागातील जनता तेलंगणा राज्यातील आदिलाबाद निर्मल व यवतमाळ येथे व्यापार, धंदा, मजुरी व दवाखान्याच्या उपचारासाठी जातात. या भागातील लोक अजूनही तेलंगणा राज्यात जाण्यास उत्सुक आहेत. तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्याची निर्मिती वेळेस 21 जिल्ह्याची निर्मिती केली. किनवट जर तेलंगणात असते तर किनवट जिल्हा झाला असता.
अप्पारावपेठ, इस्लापूर, ईवळेश्वर, माहूर, जुनापाणी, जवरला, मांडवी, किनवट, बोधडी या भागातील जंगलात नक्षलवादी प्रमुख विजयकुमार व त्याच्या साथीदारानी सन 1988 ते 1993 पर्यंत या भागात धुमाकुळ घातला होता. अनेकांची फरशी, कुऱ्हाडीने तोडून (हत्या) खून करून दहशत निर्माण केली होती. तेव्हा कुठे प्रशासन व शासनास जाग आली होती. आता या भागातील जनता भयभीतच आहे. त्यानंतर किनवट येथे मा. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, मा अतिरिक्त शेषन कोर्ट व रेल्वे ब्रीज होणार होते. परंतु काही नांदेड जिल्ह्याच्या मोठ्या नेत्यानी वरील कार्यालये व रेल्वे ब्रिज किनवट येथून भोकर कडे हलविले. येथील भागातील आदिवासी जनतेस शासन, मंत्री, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी कोणीही किनवट जिल्हा होण्यास न्याय दिला नाही. गेल्या 30 वर्षापासून विविध पक्ष संघटना, पत्रकार, नागरिक, दरवर्षी किनवट जिल्हा व्हावा म्हणून निवेदने देत आहेत. तरी शासन दरबारी याची दखल घेतली जात नाही. तरी मा. एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई आपण स्वतः लक्ष देऊन आम्हा किनवट-माहूर, इस्लापूर, मांडवी, बोधडी, भागातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून इस्लापूर, मांडवी, बोधडी या शहरास तालुक्याचा दर्जा देऊन माहूर, हिमायतनगर तालुक्याचा समावेश करून किनवट जिल्हा निर्मितीची दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा करून आम्हा जनतेस न्याय देण्याची मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
निवेदनावर नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नगराध्यक्ष इसा खान सरदार खान, के. मूर्ती, बालाजीराव आऊलवर, देविदास मुनेश्वर, मेहत्रे यांच्यासह किनवट, माहूर तालुक्यातील असंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.याप्रसंगी पत्रकार गोकुळ भवरे,संपादक आनंद भालेराव, राज माहुरकर आदी उपस्थित होते. निवेदना च्या प्रती मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे सह उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, महसूल आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी नांदेड, हिंगोली चे खासदार हेमंत पाटील, किनवटचे आमदार भीमराव केराम यांना देण्यात आले आहेत