सोनोग्राफीचा चुकीचा अहवाल दिला,महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू;डॉक्टरविरुद्ध धर्माबादेत गुन्हा दाखल
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.10.एका महिला डॉक्टरने सोनोग्राफीचा चुकीचा अहवाल दिला, परिणामी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या आरोपावरून डॉक्टरविरुद्ध धर्माबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरी तालुक्यातील एका गरोदर महिलेचा सोनोग्राफी अहवाल चुकीचा देण्यात आला.यानंतर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सोनोग्राफी करणारी तेलंगणाची महिला डॉक्टरच जबाबदार असल्याच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरी तालुक्यातील बोळसा येथील अनुसया उर्फ राणी गजानन चव्हाण (वय 19) ही सात महिन्यांची गरोदर असताना सातव्या आठवड्यातील सोनोग्राफी करण्यासाठी ती तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यातील म्हैसा येथे असलेल्या एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपचारासाठी गेली होती.या ठिकाणाहून आल्यानंतर त्यानंतर तिला त्रास सुरू झाला.त्यानंतर सर्वप्रथम उमरी व नंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले.पण, दि.6 जानेवारी 2022 रोजी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 111 मध्ये तिचा मृत्यू झाला.
सातव्या आठवड्यातील सोनोग्राफी करून महिला डॉक्टर यांनी सोनोग्राफीचा योग्य निरीक्षण अहवाल दिला नसल्याने सदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.तशी तक्रार त्यांनी पोलिसांत दिल्यावरून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम 304 (अ) प्रमाणे डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाडेकर करत आहेत.