अर्थसंकल्प -२०२२ बाबत प्रतिक्रिया- शेतकरी आणि सर्वसामान्यांचा भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प -खासदार हेमंत पाटील
नांदेड : मोदी सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पाने सुद्धा देशातील शेतकरी व सर्व सामान्यांची घोर निराशा केली आहे. दरवर्षी हा अर्थसंकल्प निवडणुका डोळयासमोर ठेवून सादर केला जातो यंदाही देशातील अनेक राज्यात असलेल्या निडवणूका हेच उद्दिष्ट असल्याचे दिसून येते. नेहमीप्रमाणे आभासी आणि फसवा अर्थसंकल्प आहे . मराठवाडयातील रेल्वे विकासाबाबत कुठेही उल्लेख नाही . कृषी उद्योगांना प्रोत्साहन मिळेल अशी कोणतीही तरतूद नाही त्याच बरोबर GST साठीही कोणत्याही ठोस धोरणाची घोषणा नाही. सर्वसामान्य जनतेला प्राधान्यक्रमाने सदैव भेडसावणाऱ्या गरजांचा कुठेही उल्लेख नाही . एकीकडे वाढत्या महागाईच्या ओझ्याखाली आणि कोरोनामुळे जनता भरडली जात असताना कर सवलतीमध्ये कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही . आपल्या कृषी प्रधान देशात शेतकरी आणि कृषी विभागाला दिलासा मिळेल असे कोणतेही आशादायी निर्णय घेण्यात आले नाहीत यामुळे देशातील शेतकरी हा पुन्हा एकदा कर्जाच्या खोल खाईत जाणार हे या अर्थसंकल्पावरून दिसून येते. गरीबांचा जास्तीत जास्त गळा आवळून श्रीमंतांना आणखी किती श्रीमंत करता येईल असा प्रयत्न या अर्थसंकल्पातून होताना दिसून येतो, अशी प्रतिक्रिया खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे.