बालिकेला पळवणारा आणि मारवाडी धर्मशाळेचा व्यवस्थापक सुध्दा तुरूंगात
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.10.अल्पवयीन बालिकेचे लग्न लावण्याचा प्रकार तिच्या आई-वडील, आजी, तिला पळवून नेणारा मुलगा आणि लग्नासाठी जागा उपलब्ध करून देणारा वजिराबाद भागातील मारवाडी धर्मशाळेचा व्यवस्थापक यांना महागात पडला आहे. अल्पवयीन बालिकेसोबत लग्न करणाऱ्या नवऱ्याचा सुध्दा नंबर लागणार आहे. याप्रकरणात एकूण पाच जण सध्या तुरूंगात आहेत.
डिसेंबर 2021 या महिन्यात नांदेडच्या वजिराबाद भागातील मारवाडी धर्मशाळेमध्ये एका अल्पवयीन बालिकेचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर ही बालिका नवऱ्याच्या घरून पळून गेली. त्यानंतर तिच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 418/2021 दाखल झाला. सुरूवातीला या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम 363 होते. पोलीसांनी याबाबत शोध घेतला तेंव्हा ती बालिका ज्या युवकासोबत पळून गेली होती. त्याचे नाव महेश शिवाजी गंजे असे आहे. पोलीसांनी त्याला पकडले. तेंव्हा नवनवीन गोष्टींचा या गुन्ह्यात खुलासा होत गेला. त्यानुसार बालिकेच्या वडीलांनी टी.सी.मध्ये खाडाखोड करून त्या आधारावर लग्न करण्यासाठी मारवाडी धर्मशाळा हे कार्यालय घेतले होते. पळवून नेणारा मुलगा महेश गंजे याची जात वेगळी होती. बालिका अनुसूचित जाती जमातीची आहे. म्हणून या गुन्ह्यात पुढे भारतीय दंड संहितेचे कलम 376, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा जोडला गेला. टी.सी. मध्ये खाडा खोड करून बालिकेचे लग्न केले होते.म्हणून त्यात बाल विवाह प्रतिबंधक कायद्याची कलमे 9-10 आणि 11 जोडली गेली. बालिका अनुसूचित जातीची असल्यामुळे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधिक्षक नांदेड शहर यांच्याकडे वर्ग झाला. त्यांना याप्रकरणात वजिराबादचे पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव यांनी सहकार्य केले.
बालिकेच्या टी.सी.मध्ये खाडाखोड करून तिचे वय 18 झाले असे दाखवून तिच्या लग्नाला संमती देणारे तिचे आई-वडील, आजी, आरोपी झाले.या लग्नासाठी वयाची तपासणी न करता जागा उपलब्ध करून देणारे मारवाडी धर्म शाळेचे व्यवस्थापक गंगाधर गंदेवाड (57) यांना आज अटक झाली. विशेष न्यायालयाने या प्रकरणात अल्पवयीन बालिकेला लग्न झाल्यानंतर पळवून नेणारा युवक महेश शिवाजी गंजे, अल्पवयीन बालिकेचे आई-वडील आणि आजी तसेच मारवाडी धर्मशाळेचे व्यवस्थापक गंगाधर गंदेवाड यांना न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात पाठवून दिले आहे.