माहूरच्या ग्रामीण रूग्णालयातील रिक्त जागा तातडीने भरा.. “आ. भिमरावजी केरामांचा जिल्हा शल्य चिकित्सकांना गर्भित इशारा”
माहूर/ प्रतिनिधी:
रूग्णाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी वैद्यकीय सेवेतील रिक्त जागा भरण्यासंदर्भात वारंवार कळवूनदेखील माहूरच्या ग्रामीण रूग्णालयातील रिक्त जागा ‘जैसे थे’ च असल्याच्या पार्श्वभुमिवर त्या तातडीने भरण्यात याव्यात असा गर्भित इशारा आ. केराम यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिला आहे.
दि.२५ रोजी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या लेखी पत्रात आ. भिमरावजी केराम यांनी ही मागणी केली आहे. तथापि माहूर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी, नेत्र चिकित्सक, लँब टेक्निशियन, क्ष-किरण तंत्रज्ञ आदी वैद्यकीय सेवेतील बहुतांश पदे मागील अनेक महिण्यांपासून रिक्त आहेत. परिणामी ग्रामीण भागातील गरीब रूग्णांना उपचारासाठी असंख्य अडचणींसोबतच त्यांची कमालीची हेळसांड होत आहे. भौगोलिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात खेडे-पाडे असलेल्या माहूर तालुक्यांतील बहुतांश गरीब रूग्णांची वैद्यकीय उपचाराची भिस्त ही माहूरच्या ग्रामीण रूग्णालयावरच अवलंबून असून येथे येणा-या रूग्णांच्या विविध आजारांवर उपचार करणारे चिकित्सक व वैद्यकीय अधिकारी नसल्याने येणा-या रूग्णांना पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधाच मिळत नाहीत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून येथील रिक्त पदे भरण्याबाबत वारंवार आपल्याकडे कळविले असल्याची सुचक कल्पना आ.केराम यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या पत्रातून दिली आहे.
त्याचबरोबर येथील रिक्त पदे भरण्याबाबतच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष केल्यामुळे रूग्णांच्या होणा-या गैरसोईसाठी आपणच जबाबदार असल्याचा थेट आरोप जिल्हा शल्य चिकित्सकांवर आ. केराम यांनी केला असून ग्रामीण भागातील गरीब रूग्णांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी वरील सर्व रिक्त पदे तातडीने भरून नागरिकांना आरोग्य उपचार सेवा मिळवून द्याव्या अशी सुचक मागणी आ. भिमरावजी केराम यांनी जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.