मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त प्रा.डॉ.भाऊसाहेब नन्नवरे यांचे ऑनलाईन व्याख्यान
तळा, रायगड : तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे, द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा जि. रायगड मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त प्रा.डॉ भाऊसाहेब मुरलीधर नन्नवरे ( सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, के.एम.सी. महाविद्यालय,खोपोली, जि.रायगड.) यांचे ‘भाषिक कौशल्ये व व्यक्तिमत्व विकास ‘या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन शनिवार दि.१५ जानेवारी २०२२ रोजी करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा, राज्य व केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये तसेच इतर सर्व प्रकारच्या संस्थानमध्ये अधिकाधिक वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतून दरवर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि.१४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो.
द.ग.तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार या मुख्य धोरणास अनुसरून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने सद्या कोविड –१९ रोगाचा प्रादुर्भाव असल्याने सर्व कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात साजरे करण्यात येणार आहेत.
भाषा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भाषा शिकणं, भाषेचा प्रभावी वापर करणं आणि विविध प्रकारची भाषिक कौशल्य आत्मसात करून स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करणे ही आजच्या काळाची गरज आहे. भाषा कौशल्यांवर प्रभुत्व संपादन केलं तर करियर आणि पर्यायानं जीवनात यशस्वी होण्यासाठी मोलाची मदत होते. ही भाषिक कौशल्ये महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना कशी आत्मसात करता येतील व त्यातून विविध क्षेत्रात करिअरच्या कोण-कोणत्या संधी आहेत? विविध क्षेत्रात करिअर करताना ही कौशल्य कशी उपयोगी ठरतील त्याचे मार्गदर्शन ‘भाषिक कौशल्ये व व्यक्तिमत्व विकास’ या विषयाचे महत्व उत्तम पद्धतीने प्रा.डॉ. भाऊसाहेब नन्नवरे यांनी आपल्या संवादसत्रातून सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुयांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ.नानासाहेब यादव यांनी करून दिला. या संवादसत्रास संस्थेचे अध्यक्ष मा.चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष मा.पुरुषोत्तम मुळे, खजिनदार मा. कौतुभ धामणकर तसेच संस्थेचे सचिव मा.मंगेश देशमुख, चेअरमन मा.डॉ.श्रीनिवास वेदक, प्राचार्य डॉ.कैलास निंबाळकर या मान्यवरांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या संवादसत्राचा लाभ पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी- विद्यार्थींनी, युवा वर्ग यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून घेतला.या कार्यक्रमाचे आभार डॉ.दिवाकर कदम यांनी मानले.