मांडवी येथे शनिवारी शासकिय सेवा व योजनांचा महा मेळावा:सकाळी ९ वाजता उद्घाटन सोहळा
किनवट*,दि.१२ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवी (ता. किनवट) येथे शनिवारी(दि.१३) सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत “शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा”,आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ९ वाजता उद्घाटन सोहळा होईल.अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल.आणेकर हे राहतील.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर(घुगे),जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे व सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच.पुजार हे उपस्थितीत राहतील.
या महामेळाव्याची जय्यत तयारी तालुका प्रशासनाने केलेली आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचावी व त्यांचा लाभ जनतेला मिळावा, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या महामेळाव्यात शासनाच्या विविध कार्यालयांचे ७५ स्टाल राहणार आहेत.या स्टालवर त्या त्या कार्यालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने जनतेकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे व पूर्तता करणाऱ्या नागरिकांना त्वरीत लाभही देण्यात येणार आहे. या स्टाल मध्ये किनवट तालुका ग्राहक पंचायतीचा ५८ क्रमांकाचा स्टाल राहणार आहे.तेथे ग्राहकांना त्यांच्या तक्रारी विषयी मार्गदर्शन व सल्ला देण्यात येणार आहे.
या महामेळाव्यास उपस्थित राहून सर्व योजनांच्या माहीतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र शां.रोटे यांच्यासह तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ.मृणाल जाधव व तालुका विधी सेवा समितीचे सचिव तथा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांनी केले आहे.