रक्ताचा अभिषेक करणारा पुसदचा भोंदू बाबा दोन भावांसह पोलीस कोठडीत ;माहूर पोलिसांचा प्रताप
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:आजच्या वैज्ञानिक युगात सुध्दा लोकांना भोंदू बाबा फसवतात असा एक प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला.या संदर्भाने पोलीसांनी तीन भावांसह एक महिला अशा एकाच कुटूंबातील चार जणांविरुध्द भारतीय दंड संहिता आणि जादूटोणा कायदा संदर्भाने गुन्हा दाखल केला आहे.यातील चारही जणांना माहूर पोलीसांनी अटक केली आहे.माहूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.जी.तापडीया यांनी या तीन जणांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड जिल्ह्यातील भगवान दत्त आणि आई रेणुका असे दोन मालक असलेल्या डोंगरात घडलेला हा अघोरी प्रकार अनेक वर्षांनंतर उघडकीस आला.
आपले कुटूंब आणि आपली नोकरी सोडून कपील बाबाचा फक्त म्हणून त्यांच्या आश्रमात राहणाऱ्या पिडीत व्यक्तीकडून 23 लाख 14 हजार 549 रुपये उकळण्यात आले आहेत. आपल्या रक्ताने देवीला अंघोळ घालण्याचे व्हिडीओ आहेत.
बाबांना पैसे दिल्याचे व्हिडीओ आहेत,बाबांची पुजा केल्याचे फोटो आहेत अशा सर्व प्रकारांमुळे आजच्या विज्ञान युगात सुध्दा या अघोरी प्रथांवर लोकांचा विश्र्वास का संपत नाही हा प्रश्न मात्र उभाच आहे.
प्रसारमाध्यमे सुध्दा या बाबत नेहमी आपल्या लेखणीला झिजवत असतात.तरीपण समाजावर त्याचा परिणाम होत नाही हा दुर्देवी प्रकार आहे.
प्रविण निवृत्ती शेरेकर (29) रा.कोपरगाव डोंबिवली जि.ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2006 म्हणजे आजपासून 15 वर्षापुर्वी त्यांना ताप आला.
अनेक रुग्णालयांमध्ये उपचार केले पण त्यांचा ताप दुरूस्त होत नव्हता.केईएम रुग्णालय येथे त्यांनी उपचार घेतला हा आजार स्टील डीसीज असल्याचे सांगण्यात आले.केईएमच्या उपचारानंतर थोडा फरक पडला आणि सन 2012 मध्ये प्रविण शेरेकरने मुंबई येथे पटेल इंजिनिअरींग कंपनीमध्ये सुरक्षा विभागात अधिक्षक पदावर काम करणे सुरू केले.
याच कंपनीतील त्यांचा सहकारी योगेश भालेराव याने पुसद जि.यवतमाळ येथील कपील बाबा अशा रोगांवर छान उपचार करतात, त्यांच्याकडे दैवी शक्ती आहे असे सांगितले.त्यानंतर विश्र्वजित रामचंद्र कपीले यांची डिसेंबर 2013 मध्ये भेट झाली.
त्यानंतर त्यांनी उपचारासाठी पुसदला यावे लागेल असे सांगितले.2014 पासून पुसद, माहूरगड अशा फेऱ्या सुरू झाल्या. या फेऱ्यादरम्यान आपल्या रक्ताने कालीमातेच्या मुर्तीवर प्रविण शेरेकर यांनी अभिषेक केला.वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कामाचे वेगवेगळे पैसे कपील बाबा घेत राहिला पण प्रविण शेरेकरचा आजार कांही बरा झाला नाही.त्यानंतर गाणगापुर येथे सुध्दा प्रविण शेरेकरला नेले अखेर त्याने आपली नोकरी सोडून बाबाची सेवा पत्कारली आणि ते बाबासोबत आश्रमात राहु लागले.
2019 पासून आश्रमात राहिलेल्या प्रविण शेरेकरला बाबाचा खोटारडेपणा हळुहळू लक्षात आला.बाबा मटक्याचे आकडे सांगणे,गुप्त धन काढून देण्यासाठी प्रयत्न करणे,माहूर किल्ला परिसरात अनेक खड्डे खोदून गुप्तधन शोधले,कासव आणि मांडूळ जातीच्या सापाच्या साह्याने गुप्तधन काढण्याचा प्रयत्न केला,भुतबाधा काढणे असे कामे करत होता आणि बिचारा प्रविण शेरेकर घोड्यांची निघा राखणे,झाडू मारणे या कामासाठीचाच राहिला होता. कारण सात वर्षाच्या कालखंडात बाबाने त्याच्याकडून 23 लाख 14 हजार 549 रुपये उकळले होते. त्यामुळे प्रविण शेरेकर आता घोड्यांची लिद काढण्यासाठीचाच होता.
आपल्यावर झालेल्या या फसवणूकीची सत्यता लक्षात आल्यावर प्रविण शेरेकर आणि त्याच्या काही नातलगांनी कपील बाबाच्या घरी पुसद येथे जावून विचारणा केली.पण तेथे तर त्याला भिकाऱ्यापेक्षा वाईट वागणूक मिळाली आणि तेथून तो पळून आला.जेथे कोणीच कोणाचे नसते तेथे महाराष्ट्र पोलीस मात्र प्रत्येकासाठी आपल्या कामात सर्वात महत्वाचे काम समजून त्याला मदत करतात असाच अनुभव प्रविण शेरेकरला माहूर पोलीस ठाण्यात आला.पोलीसांमध्ये काही जण वगळून असे लिहिले तर चुकीचे ठरणार नाही.पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्याशी चर्चा करून माहूरचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे यांनी प्रविण शेरेकरच्या तक्रारीवरुन विश्र्वजित रामचंद्र कपीले,रवि रामचंद्र कपीले,कैलास रामचंद्र कपीले आणि याच कुटूंबातील एक महिला अशा चौघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 328, 506, 34 आणि महाराष्ट्र नरबळी व इतर आमानुष अनिष्ठ आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन तसेच काळा जादू नियम 2013 यातील कलम 3 नुसार गुन्हा क्रमांक 126/2021 दाखल केला.
माहूर पोलीसांनी विश्र्वजित रामचंद्र कपीले,रवि रामचंद्र कपीले,कैलास रामचंद्र कपीले अशा तिघांना ताब्यात घेतले आहे.
आज दि.14 ऑक्टोबर रोजी भोंदूगिरी करणाऱ्या या बाबासह त्याच्या दोन भावांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माहूर यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. सुरू असलेला हा भोंदूगिरीचा प्रकार जुना आहे त्यासाठी या प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.
म्हणून या तिघांना पेालीस कोठडी द्यावी अशी विनंती करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी पी.जी.तापडीया यांनी या तिन भोंदूबाबांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे हे करीत आहेत