स्वारातीम विद्यापीठात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे लवकरच उद्घाटन करणार – ना.उदय सामंत
नांदेड दि. 13 –
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र कार्यान्वित करावे आणि त्यासाठी लागणारे आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी लावून धरली होती. मात्र हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. परंतू गुरूवार, दि. 12 ऑगस्ट मंत्रीमहोदयांनी निवेदन दिल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काही दिवसातच विद्यापीठातील अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन केंद्राचे उद्घाटन मी स्वतः करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने विद्यापीठात अध्यासन केंद्र आणि त्या केंद्रास मंजुरी व आवश्यक निधी देण्यात यावे यासाठी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाच्या वतीने अनेकवेळा निवेदने देऊन पाठपुरावा केला होता. विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वरील घोषणा केली. ही सकारात्मक घोषणा केल्याबद्दल अण्णा भाऊ साठे प्रेमी व सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.
ना.उदय सामंत यांना भेटलेल्या शिष्टमंडळात अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक सतीशजी कावडे यांच्यासह अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीबाई साठे आणि मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सन्माननीय सदस्य सचिन मानवहित लोकपक्षाचे महासचिव गणेश भगत, परमेश्वर बंडेवार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य शिवा कांबळे, एम.बी. उमरे, एन.जी. पोतरे, शिवाजी नुरुंदे, चंपतराव हातागळे, पिराजी गाडेकर, नागेश तादलापुरकर, माणिक कांबळे, विठ्ठल घाटे, आनंद वंजारे, बालाजी गऊळकर, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.