हिंगोली लोकसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्याची खासदार हेमंत पाटील यांची मागणी
किनवट : हिंगोली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या खूपच संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत . संथ गतीने सुरु असलेली कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी महामार्गाचे व संबंधित कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे .
नागपूर-बोरी -तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीट करणाचे काम सुरु आहे . परंतु या महामार्गावर हिंगोली लोकसभा मतदारसंघात महागाव ते नांदेड दरम्यान खूपच संथ गतीने काम चालू आहे . त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही काहीच कार्यवाही करण्यात येत नाही याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन अशी मागणी केली आहे कि, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि काम करणाऱ्या संबंधित कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांना देण्यात यावेत . तसेच हिंगोली लोकसभा मतदारसांघातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून जाणाऱ्या किनवट- हिमायतनगर-भोकर फाटा -आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत- परभणी पर्यंत जाणाऱ्या महामार्गाचे काम सुद्धा मागील चार वर्षांपासून खोळंबले आहे . यामुळे यंदाच्या पावसाळयात नांदेड – किनवट मार्गावर बांधण्यात आलेले तात्पुरत्या स्वरूपातील पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक अनेक तास बंद करण्यात आली होती. हि बाब सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी मंत्री महोदयाच्या निदर्शनास आणून दिली .एकंदरीत हिंगोली लोकसभेतील सुरु असलेल्या कामाबाबत गांभीर्याने लक्ष देऊन सर्व सामान्य नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर कराव्यात असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .
किनवट मधून जाणारा महामार्ग इस्टिमेट प्रमाणेच व्हायला पाहिजे याबाबत शिवसेनेचे तालुका संघटक प्रमुख भंडारवार,प्रशांत कोरडे यांनी पत्रकार परिषद घेऊन 21 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता याबाबत माननीय नितीन गडकरी काय निर्णय घेतात या कडे किंनवाटवासीयांचे लक्ष लागून आहे.