*महाभ्रष्टयुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबईसह महाराष्ट्र जंगलराज; कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार फेल – खा. वर्षा गायकवाड*
*माजी मंत्री बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या ही महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना.*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फक्त पोकळ घोषणा, गुन्हेगारांना कायद्याचा धाकच नाही.*
*निष्क्रिय, बेजबबादार व अकार्यक्षम गृहमंत्री फडणवीसांची तात्काळ हकालपट्टी करा.*
मुंबई, दि. १३ ऑक्टोबर
राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारी आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या लोकप्रतिनिधीला वांद्र्यासारख्या भागात खुलेआम गोळ्या घातल्या जातात ही गंभीर बाब आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे कुठे? असा संतप्त सवाल करत भाजपा-शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबईसह महाराष्ट्र जंगलराज बनले आहे, अशी प्रतिक्रीया मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, बाबा सिद्दीकी यांना धमक्या येत होत्या व त्यासंदर्भात त्यांनी तक्रारही केली होती, त्यांना सुरक्षा होती तरीही हत्या केली. महाराष्ट्रात लोकप्रतिनिधीही सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री काय करत आहेत. शिंदे फडणवीसांच्या राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही, गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. बलात्कार, खून करून आरोपी फरार होतात. लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी काम करत असतात, जिथे लोकप्रतिनिधीच सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांचे काय ? महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला शिदे-फडणीसच जबाबदार आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने राज्याच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. देवेंद्र फडणीस हे निष्क्रिय, बेजबादार व अकार्यक्षम गृहमंत्री असून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे थोडीही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी फडणवीस यांची तात्काळ हकालपट्टी करावी.
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. कायद्याचे पालन करणारे राज्य जंगलराज बनले आहे. गेल्या वर्षभरात मुंबईतच लोकप्रतिनिधींवर गोळ्या झाडल्या जाण्याची ही तिसरी घटना आहे. महाराष्ट्रात जे घडत आहे ते अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. वाढत्या गोळीबाराच्या घटना, गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात रिल्स बनवणं आणि सीएम व डीसीएमसोबत फोटो काढणे, सामाजिक ध्रुवीकरण आणि हिंसेचे राजकारण वाढणे या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढले आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या व्यक्तीची जर रस्त्यावर गोळ्या घालून हत्या केली जात असेल तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेची काय अवस्था? राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता महामहिम राज्यपाल यांनीच हस्तक्षेप करावा व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.