*अदानीची जमिनीची भूख कधी थांबणार? देवनारची १२५ एकर जमीनही ‘लाडका उद्योगपती’ अदानीच्या घशात :- खा. वर्षा गायकवाड*
*मोदीशहांच्या आशिर्वादने मुंबईची लुट सुरुच; धारावीच्या नावाखाली मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा रिअल इस्टेट घोटाळा.*
*लाखो धारावीकरांना बळजबरीने विस्थापित करुन धारावीत ‘अदानी सिटी’ उभारण्याचे षडयंत्र.*
मुंबई, दि. १४ ऑक्टोबर
धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली अदानी उद्योग समुहाला किती जमीन द्यायची हे काही थांबत नाही. अदानीची जमिनीची भूख वाढतच चालली आहे. मोदानी सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या असून आता देवनारची १२५ एकर जमीनही अदानीच्या घशात घातली आहे. मुंबईकरांच्या हक्काच्या जमिनी पद्धतशीरपणे लुटण्याचा प्रकार सुरु असून मोदीशहांच्या आशिर्वादाने मुंबईच्या इतिहासातील हा सर्वात मोठा रिअल इस्टेट घोटाळा आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
भाजपा सरकारने घेतलेल्या निर्णयाचा समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा युती सरकारचे शेवटचे काही दिवसच शिल्लक आहेत परंतु प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींच्या लाडक्या मित्राला मुंबईतील जमिनी देण्याचे निर्णय धडाधड घेतले जात आहेत. अदानीच्या धारावी ‘विनाश’ प्रकल्पासाठी याआधी मिठागरांच्या जमिनी दिल्या आहेत, मढ आयलंड आणि आक्सा येथील नो-डेव्हलपमेंट झोनमधील जमिनी दिल्या, कुर्ल्यातील मदर डेअरीची इको-सेन्सिटिव्ह जमिनही दिली आहे आणि आता देवनारमधील १२५ एकर जमीन दिली आहे. ही जमीन पूर्वी कचरा डंपिंग ग्राउंड होती आणि आजही येथे विषारी वायूचे विसर्जन सुरू आहे. लाखो कष्टकरी धारावीकरांना बळजबरीने विस्थापित करुन त्यांची घरे आणि उपजीविकेचे साधन संपवून अदानी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्ससारखी आपली ‘अदानी सीटी’ उभा करत आहे आणि दुसऱ्या बाजूला धारावीकरांना देवनारसारख्या विषारी पडीक जमिनीत हाकलले जात आहे. लाखो धारावीकरांना विस्थापित करुन त्यांना अमानुष पद्धतीने भाड्याच्या घरात राहण्यास भाग पाडले जात आहे.
धारावीकरांनी आपल्या कष्टाने, घामाने, कौशल्याने आणि एकजुटीने धारावी बनवली आहे. धारावीकर कुठेही जाणार नाहीत, त्यांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे. धारावीकरांना विस्थापित करून भाजपा सरकार अदानीला प्रचंड मोठा फायदा करुन देत आहे, ते कदापी होऊ दिले जाणार नाही. मुंबईची ही लूट थांबवण्यासाठी एकजूट होऊन लढा देऊ, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.