ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांचे नुकसान 🔸 तूर पाठोपाठ हरबऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव
कंधारः- (डॉ.माधव कुद्रे)
तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. पाऊस पडल्यास पिकांना फायदा होईल; मात्र ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळीचा प्रादूर्भाव वाढवणार आहे. या नैसर्गिक संकटामुळे रब्बी हंगामाच्या उत्पादकतेवरही परिणाम होणार आहे.
तालुक्यात रब्बीच्या पिकांना प्रतिकूल वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. यावर्षी पावसाने धुमाकूळ केल्याने उडीद, मूग, सोयाबीन ही पिके सततच्या पावसामुळे मातीमोल झाले. रब्बी हंगामाची पेरणी जेमतेम झाली. यंदा अतिवृष्टी झाल्याने सगळं गेलं, अशी अवस्था असताना रब्बीच्या हंगामाने थोडंफार काही येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र या ढगाळ वातावरणाने तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आता शेतकरी चिंतेत आहे. यंदाच्या पावसाळ्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यंदाच्या खरीप हंगामातील उत्पन्नाच्या सर्व आशा आता मावळल्या असून कापूस, सोयाबीन पाठोपाठ आता तूर उत्पन्नावरही गंडांतर आले असल्याचे चित्र आहे.
सध्या तूर पीक शेंगाच्या अवस्थेत असून हरभरा पिकाची वाढ पूर्ण झाली आहे. मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे. काही भागात रिमझिम पाऊस झाला आहे. जोरदार पाऊस झाल्यास पिकांना फायदा होईल; पण ढगाळ वातावरण पिकांसाठी नुकसानकारक आहे, असे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा तूर पिकात आणि हरभरा पिकात प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. प्रतिकूल वातावरण आणखी तीन दिवस राहिल्यास पिकांवर निश्चित दुष्परिणाम होण्याची भीती आहे. दरम्यान, पिकांची उत्पादकता टिकवण्यासाठी व अळीचा बंदोबस्त करण्यासाठी परिणामकारक औषधांची फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी संकटात असून तूर पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी याभागातील शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.