काँग्रेस पक्षाकडून सर्व पदे भोगूनही संजय निरुपम गद्दारच निघाले – सुरेशचंद्र राजहंस
दलित समाजाच्या नेतृत्वावर टीका करून संजय निरुपम कडून दलित समाजाचा अपमान.
संजय निरुपम यांच्या काळात मुंबई काँग्रेस कमजोर, पदांचा उपयोग केवळ स्वार्थासाठी.
मुंबई, दि. ५ एप्रिल
काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम मागील काही दिवसांपासून सातत्याने पक्षविरोधी कारवाया करत असतानाही पक्षाने त्यांना स्टार प्रचारक केले होते परंतु ज्या ताटात खायचे त्यातच घाण करायची प्रवृत्ती असलेल्या संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्ष, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, मल्लिकार्जून खर्गे, प्रियंका गांधी व वेणुगोपाल यांच्या नेतृत्वावर टीका करुन सर्व मर्यादा पार केल्या आहेत. निरुपम यांना काँग्रेस पक्षाने खासदार केले, मुंबईचे अध्यक्षपदही दिले पण शेवटी त्यांनी पक्षाशी गद्दारी केली,अशी टीका काँग्रेस प्रवक्ते आणि मुंबई काँग्रेसच्या स्लम विभागाचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर संजय निरुपम यांना काँग्रेस पक्षाची कार्यपद्धती व वरिष्ठ नेत्यांमध्ये दोष दिसू लागले. कालपर्यंत याच नेत्यांच्या हाताखाली काम करणारा व त्यांच्या भेटींसाठी धडपड करणाऱ्या निरुपम यांना अचानक साक्षात्कार झाला आणि त्यांच्यात उणिवा जाणवू लागल्या. संजय निरुपम वरिष्ठ नेत्यांवर टिका करत असताना त्यांनी काँग्रेस पक्षासाठी काय केले हे आधी सांगायला पाहिजे. मुंबई काँग्रेसेच अध्यक्षपद असताना त्यांनी मुंबईत काँग्रेस वाढीसाठी काय प्रयत्न केले, तसे काही प्रयत्न केले असते तर काँग्रेस पक्ष मजूबत झाला असता व त्याचे परिणाम दिसले असते पण केवळ वाचाळपणा करून पक्ष वाढत नसतो.
काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष एकाच समाजाचा, राज्यसभा खासदार एकाच समाजाचा, CWC मेंबर एकाच समाजाचा व मुंबई विभागीय काँग्रेस अध्यक्षही एकाच समाजाचा असे विधान करुन संजय निरुपम यांनी मल्लिकार्जून खर्गे, चंद्रकांत हंडोरे, प्रा. वर्षाताई गायकवाड यांचाच अपमान केला असे नसून दलित समाजाचा त्यांनी अपमान केला आहे. संजय निरुपम यांनी नेहमीच दलित नेतृत्वाचा द्वेष आणि तिरस्कारच केला आहे. संजय निरुपम यांनी उत्तर भारतीय समाजाचे नेतृत्वही जाणीवपूर्वक निर्माण होऊ दिले नाही. अशा अहंकारी, मुजोर, गद्दार व्यक्तीची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय योग्यच आहे, असेही सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.