श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील मंदिरात श्रीराम प्रभूची मूर्ती प्राणप्रतिष्ठा दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होणार
किनवट (प्रतिनिधी )श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील मंदिरात श्रीराम प्रभूची मूर्ती प्राणप्रतिष्ठा दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. तरी सकल हिंदू बांधवांना या आनंदोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण प्रत्येक घरी जाऊन अक्षता देऊन देण्यात येणार आहे . त्या अभियानांतर्गत श्री राम जन्मभूमी अयोध्या येथून अक्षत कलश दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता रेल्वेने रेल्वे स्टेशन किनवट येथे आणण्यात आला. त्यानिमित्ताने सकल हिंदू समाज किनवट च्या वतीने भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभा यात्रा रेल्वे स्टेशन किनवट येथून निघून बिरसा मुंडा चौक, जिजामाता चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, विठ्ठलेश्वर मंदिर ते राम मंदिर अशी काढण्यात आली होती. ही शोभायात्रा वाजंत्री टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली होती . अयोध्या येथून आलेला कलश व श्रीराम प्रभूची प्रतिमा एका मोटारीत विराजमान करण्यात आली होती . हा कलश विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री यांनी संभाजीनगर येथून आणला होता हा कलश यासोबत विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांताचे उपाध्यक्ष सुरेश महाराज नांदेड विभाग धर्माचार्य प्रमुख नरसिंग महाराज , साई मंदिर चे विश्वस्त पवार गुरु स्वामी, पांडे महाराज, आयप्पा स्वामी दीक्षा घेतलेले भक्तगण राम मंदिराचे पुजारी हे उपस्थित होते.
यावेळी किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम हे शोभायात्रेत सहभागी झाले होते. तसेच कलशधारी महिला भगवे झेंडे यामुळे हि शोभा यात्रा शोभून दिसत होती. 1000 राम भक्त महिला पुरुष यांनी यात सहभाग घेतला. राम मंदिर किनवट येथे हा अक्षत कलश ठेवण्यात आला . त्यानंतर त्याचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा या आनंदोत्सव कार्यक्रमाचे सविस्तर माहिती विश्व हिंदू परिषदेचे अनिरुद्ध केंद्रे यांनी दिली. महाआरती व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. 22 जानेवारी रोजी आयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास किनवट येथील साधुसंत आत्राम महाराज मलकापूर खेरडा, शिरडे महाराज मोहपूर, गंगेश्वर महाराज महादेव मंदिर मदनापुर ,प्रकाश महाराज मिटकर वाळकेवाडी यांना अयोध्या येथे निमंत्रित करण्यात आले आहे. हा कलश राम मंदिर रामनगर किनवट येथे दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. तरी सर्व राम भक्तांनी या कलशाचे दर्शन घ्यावे असे आवाहन लोकोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
1 ते 15 जानेवारी दरम्यान या कलशातील अक्षता व राम मंदिराची प्रतीमा गावोगावी घरोघरी देण्यात येईल. आणि सर्व राम भक्तांना आपल्या जवळच्या मंदिरात आनंद उत्सव साजरा करण्यासाठी 22 जानेवारी चे निमंत्रण देण्यात येईल.
22 जानेवारीला प्रत्येक मंदिरात रामनाम जप आणि आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे . प्रत्येक राम भक्ताने आपल्या जवळील मंदिरात येऊन मोठ्या पडद्यावरती अयोध्येच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या घरी पाच दिवे लावून आकाश कंदील लावून फटाके फोडून दिवाळी साजरा करावी अशी योजना करण्यात आली आहे.