2005 नंतरच्या मयत शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनमधील फॅमिली पेन्शन, ग्रॅज्युएटीचा लाभ; मयत कर्मचाऱ्यांच्या 18 वर्षाचा वनवास अखेर संपला
किनवट (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने नुकताच 31 मार्च 2023 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार 31 ऑक्टोबर 2005 रोजी व त्यानंतर सेवेत रुजू होऊन शासकीय सेवेत कर्तव्यावर असताना मृत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना केंद्रशासनाप्रमाणे 1982-84 च्या जुन्या पेन्शनमधील कुटुंब निवृत्ती वेतन योजना, ग्रॅज्युएटी म्हणून जवळपास 14 लाखापर्यंत लाभ मिळणार आहे तसेंच सेवा काळामध्ये अपंगत्व आल्यास कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार आहे. या शासन निर्णयामुळे जवळपास चार ते पाच हजार मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आधार व न्याय मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना राज्याध्यक्ष वितेश खांडेकर सचिव गोविंद उगले कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे,आशुतोष चौधरी कोषाध्यक्ष प्रवीण बडे सल्लागार सुनील दुधे राज्यप्रसिद्धीप्रमुख मारोती भोसले यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रातील मयत तसेच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जुनी पेन्शन योजना जसेच्या तसे लागू करावी या एकमेव मागणी घेऊन महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात गेली दहा वर्षापासून आंदोलन उपोषण धरणे घंटानाद मुंडन आंदोलन आक्रोश मोर्चा,पायीदिंडी,पेन्शन संकल्प यात्रा असे अनेक आंदोलन उपोषण केलेली आहेत. याचाच भाग म्हणून 27 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातील सर्व विभागातील दीड ते दोन लाख सर्व शासकीय कर्मचारी हे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर संकल्प यात्रा च्या निमित्ताने रस्त्यावर उतरली होते.त्यावेळी हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेला आश्वासित केले होते की लवकरच मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी केंद्र शासनाप्रमाणे जुन्या पेन्शन मधील फॅमिली पेन्शन ग्रॅज्युएटी देण्याचे आश्वासित केले होते आणि आज त्या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर केला. जुन्या पेन्शनची ही अर्धी लढाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. जुनी पेन्शन मिळेपर्यंत हा पेन्शनचा संघर्ष शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहणार असे मत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख मारोती भोसले यांनी व्यक्त केले.
कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रॅज्युएटीमधून मिळणारे लाभ
1. आता कोणताही कर्मचारी रिटायर होण्यापूर्वी मृत झाल्यास त्याच्या परिवाराला शेवटच्या पगाराच्या 50% दराने दहा वर्ष आणि त्यानंतर 30% दराने पेन्शन मिळेल.
2. कर्मचाऱ्याला कोणत्याही कारणाने आजार वा अन्य कारणाने दवाखाण्यात उपचार घेण्याची व त्यातून शासन सेवा करणे शक्य झाले नाही तर रुग्णता पेन्शन मिळेल.
2. कर्मचाऱ्यांच्या मृत्यू नंतर शेवटच्या पगाराच्या प्रमाणात जास्तीत जास्त 14 लाख रुपयापर्यंत ग्रॅज्युटी मिळेल.
3. रिटायर झाल्यावर सुध्दा जुन्या कर्मचाऱ्याप्रमने 14 लाख रूपया पर्यंत ग्रॅज्युटी मिळेल.फॅमिली पेन्शन घ्यायची असल्यास DCPS/NPS खात्यात जमा असलेल्या रक्कमेमधील शासनवाटा रक्कम मिळणार नाही.