जातीचा बनावट दाखला देऊन खासदार झालेल्यांची खासदारकी कधी रद्द करणार?- काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस
मुंबई, दि. २४ मार्च
काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याच्या २४ तासाच्या आतच त्यांची खासदारकी रद्द करण्याची तत्परता मोदी सरकारने दाखवली. एवढ्या प्रचंड जलदगतीने कारवाई केली तशीच जलदगतीने कारवाई इतर प्रकरणातील खासदारांबद्दल दाखवली जात नाही. जातीचा बनावट दाखल दाखवून खासदार झालेल्या नवनीत राणा यांच्याबाबतीत ही तत्परता का दाखवली जात नाही? असा सवाल मातंग समाजाचे नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी विचारला आहे.
नवनीत राणा या अमरावती राखीव मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांनी जातीचा बनावट दाखला दिला होता, न्यायालयाने त्यांचा जातीचा दाखला रद्द ठरवला असून सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. शिवडी सत्र न्यायालयातही नवनीत राणा व त्यांच्या वडीलांविरोधात बनावट जात दाखल्याप्रकरणी खटला सुरु असून नवनीत राणा व त्यांच्या वडिलांविरोधात अनेक वेळा समन्सही बजावण्यात आले आहे. नवनीत राणा यांच्या वडीलांना फरारही घोषीत करण्यात आलेले आहे.जातीचा बनावट दाखल्याच्या आधारे खासदार होऊनही त्यांची खासदरकी रद्द व्हावी यासाठी तत्परता दाखवली जात नाही.
सोलापूरचे भाजपा खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केले. बनावट जातीचा दाखला तयार करणाऱ्याला पोलिसांनी अटकही केली. त्यांचे प्रकरणही कोर्टातच आहे.या दोघांची खासदारकी रद्द करण्यासाठी मात्र कोणतीच यंत्रणा तत्परता दाखवत नाही. राहुल गांधी यांच्याबाबतीत मात्र एका विधानाचा आधार घेत तक्रार करण्यात आली व न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत २ वर्षांची शिक्षा ठोठावताच मोदी सरकारने तत्परता दाखवत २४ तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द केली. हाच न्याय नवनीत राणा व डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना लावावा असे राजहंस यांनी म्हटले आहे.