शेतकरी हिताचे उद्योग उभे राहण्यास एमआयडीसीत मूलभूत सुविधा द्या ; दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
किनवट : शेतकरी हिताचे उद्योग उभे राहण्यास तालुक्यातील एकमेव एमआयडीसी, कोठारी (चि) येथे पक्के रस्ते , पुल , वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र सब स्टेशन , पाणी आदि अत्यावश्यक मूलभूत सुविधा तातडीने द्याव्यात या मागणीचे निवेदन दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत दिले. याबाबी उपलब्ध झाल्यास नवे उद्योग येथे बाळसे धरल्याशिवाय राहणार नाही.
किनवट : तालुक्यातील कोठारी (चि) येथील एमआयडीसीत सुरु झालेला एकमेव उद्योग मे. लुंबिनी कापूस जिनिंग व प्रेसिंग उद्योग मूलभूत सुविधांच्या प्रतिक्षेत ( छाया : निवेदक कानिंदे )
अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये ( एमआयडीसी ) उद्योग वाढीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने उद्योग वाढीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणामुळे आपल्या उद्योगाला भरभराटी येईल या हेतूने मागील वर्षी राजरत्न कानिंदे यांनी 15 कोटीची गुंतवणूक करून शेतकऱ्यांच्या हितासाठी मे. लुंबिनी कापूस जिनिंग व प्रेसिंग उद्योग सुरु केला. शेतकरी हिताचा हा पहिलाच उद्योग असून सद्यस्थितीत येथे 30 कामगार पूर्ण वेळ काम करून उदरनिर्वाह करत आहेत. येथे ग्रामीण फिडरवरून पुरवठा असल्याने वारंवार वीज खडीत होते. निदान स्वतंत्र एक्सप्रेस फीडर मिळावे अशी अपेक्षा आहे.
आदिवासी भागातील उद्योग वाढीसाठी एमआयडीसीत पक्के रस्ते, कायमस्वरूपी मुबलक वीज पुरवठ्यासाठी एमआयडीसीला सब स्टेशन, पाणी व ईतर पायाभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सदस्य मारोती सुंकलवाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे
निवेदनात नमूद केले की आदिवासी दुर्गम भागात उद्योग वाढीला चालना मिळून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी किनवट ते नांदेड मार्गावर कोठारी (चि ) शिवारात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीची शेकडो एकर जागा 25 वर्षांपासून अस्तित्वात आहे. नवउद्योजकांना येथे भाडेतत्वावर प्लॉट देण्यात येतात. परंतु प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे येथे अद्यापही पायाभूत सुविधा उपलब्ध न झाल्याने नवउद्योजकांनी किनवटकडे पाठ फिरविली आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या सूचनेवरून दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड यांनी एमआयडीसीची प्रत्यक्ष पाहणी केली असता असे आढळून आले की, येथे पक्के रस्ते, त्यावर पुलं , मुबलक वीज व पाणी उपलब्ध नाही. यामुळे इथे उद्योग उभे राहात नाहीत. येथे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उद्योगांमध्ये वाढ होत नसल्याच्या सबबी खाली भाडेतत्त्वावरील जागा उद्योजकाकडून परत मागवून अन्याय करत असल्याचा आरोप सुंकलवाड यांनी केला आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेल्या तुघलकी कारभाराचा फटका आदिवासी भागातील उद्योगवाढीला व नवउद्योजकांना बसत असून यासंदर्भात यापूर्वी वारंवार तोंडी सांगून देखील दुर्लक्ष करण्यात आल्याचे म्हटले आहे . तालुक्यातील नैसर्गिक साधन संपत्ती लक्षात घेता येथील एमआयडीसीत उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते परंतु पायाभूत सोयी अभावी एमआयडीसीची शेकडो एकर जागा निरुपयोगी ठरत आहे. किनवटच्या आदिवासी दुर्गम भागात उद्योग वाढून रोजगाराला चालना मिळावी यासाठी येथील एमआयडीसी अत्यावश्यक असलेल्या पायाभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात अशी आग्रही मागणी सुंकलवाड यांनी निवेदनातून केली आहे. यापूर्वीही त्यांनी आंदोलनाच्या इशाऱ्यावर गोकुंद्यातील ठाकरे चौक ते बिरसामुंडा चौक पक्का रस्ता नालीसह करून घेतला असून व्यपगत झालेली केंद्र व राज्य पुरस्कृत जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत गोकुंदा पाणी पुरवठा योजना पुनःश्च मंजुर करून आणली आहे.