अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर झालेच पाहिजे अन्यथा खांद्यावरची घोंगडी खाली ठेवून हातातील काठी घेऊन रस्त्यावर येण्यास भाग पाडू नका-अमन कुंडगीर
किनवट/प्रतिनिधीः राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारत देशाच्या प्रेरणास्थान आहेत. मोघल, निजामशाहीत व हिंदू संस्कृतीवर होणार्या हल्ल्यावर त्यांनी लगाम लावला होता. हिंदू संस्कृतीत त्यांनी प्राण फुंकले, त्यांनी अनेक घाट बांधले, बारव बांधले, मंदिरे बांधली, मंदिराचे पुर्ननिर्माण केले. स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. अशा थोर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्यात यावे, अन्यथा खांद्यावरची घोंगडी खाली ठेवून हातातील काठी घेवून रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका, असा इशारा धनगर समाज संघर्ष समितीचे सोशल मिडया प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी दिला.
अहमदनगर जिल्ह्याला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. मा.खा.डॉ.विकास महात्मे, आ.गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून शिंदे सरकारने लवकरच नामांतर करू अशी घोषणा केली आहे. परंतु काही विघ्नसंतोषी लोक अडथळा निर्माण करीत आहेत. येणार्या काळात या मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व समाज बांधवांना सोबत घेवून मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचे अमन कुंडगीर यांनी सांगीतले.
या आंदोलन यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात खेडयापाड्यात जावून समाजातील लोकांच्या भेटी व बैठका घेवून संघटनात्मक कार्य करीत आहेत. मोठे संघटन उभारून या आंदोलनासाठी कुठेही कमी पडणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी सांगीतले.