गटविकास अधिकारी दुपारनंतर गैरहजर ; पंचायत समिती कार्यालय वा-यावर
किनवट,दि.१८:* ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या पंचायत समिती कार्यालयात कार्यालय प्रमुख गटविकास अधिकारी हे शुक्रवारी (दि.१६) अर्ध्या दिवसाची सुट्टी न घेताच दुपारी नंदिग्राम एक्स्प्रेस ने नांदेडला रवाना झाल्याने पंचायत समिती कार्यालय हे दुपारनंतर ओस पडले होते.
सेनापती गेल्यावर सैन्याची जी अवस्था होते त्या सारखिच अवस्था या कार्यालयाची दिसत होती. ३० ते ३५ कर्मचारी संख्या असलेल्या या कार्यालयात मोठ्या मुश्किलीने १० ते १५ कर्माचारी हे उपस्थित असल्याचे दिसत होते. ग्रामीण भागातून मोठ्या आशेने काम घेऊन आलेल्या नागरिकांना काम न होता हात हलवत रिकाम्या हातानेच परतावे लागले,यांची खंत अनेक ग्रामस्थांनी सदर पत्रकाराशी बोलताना व्यक्त केली.
शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर कार्यालयाची वेळही बदलली होती. सायंकाळी ५:४५ पर्यंत कार्यालय असते.परंतु,अनेक कर्मचारी हे दर सोमवारी सकाळी उशिरा कार्यालयात येतात व दर शुक्रवारी दुपारी १२ नंतर कार्यालय सोडतात.किनवट हा आदिवासी, डोंगराळ व दुर्गम तालुका असूनही कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती संबंधाने आम्हचे लोकप्रतिनिधीं हे गंभीर नसतात.’अर्था,’ शी संबंध येत नसल्याने ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात,यामुळे कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार वाढत चालला आहे .
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे मिटींग किंवा दौऱ्याच्या नावावर अनेकदा कार्यालयात गैरहजर असतात. त्यांनी फक्त नावालाच येथे एक सिंगल रुम घेतलेली आहे.त्यांचे कुटुंब हे नांदेडलाच रहात असल्याने नेहमीच त्यांना नांदेडचीच ओढ लागलेली असते.यातच त्यांची सेवानिवृत्ती जवळ आल्याने ते कसेबसे आता ते येथे दिवस काढत आहेत. हा प्रकार त्वरीत थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कर्तव्य दक्ष व कर्तबगार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावें,अशी मागणी ग्रामीण भागातील जागृत ग्रामस्थातून होत आहे.