३३२ कोटींच्या नांदेड मलनिःसारण प्रकल्पास तांत्रिक मंजुरी* *माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराला यश
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.10.माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुढाकार घेऊन प्रस्तावित केलेल्या नांदेड-वाघाळा महानगर पालिका मलनिःसारण प्रकल्पाला सचिव पातळीवरील राज्यस्तरीय तांत्रिक समितीने आज मंजुरी दिली आहे.त्यामुळे हा प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे.
शहरातील मलनिःसारण यंत्रणा अधिक सक्षम करावी,या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदरहू योजनेसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.महानगरपालिकेच्या मलनिःसारण प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत शहरात एकूण ४४० किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलनिःसारण वाहिन्या टाकल्या जाणार आहेत.
या प्रकल्पाचे काम अमृत योजनेंतर्गत केले जाणार असून,त्यामध्ये ३३.३३ टक्के खर्च केंद्र सरकार,३६.६७ टक्के राज्य सरकार तर ३० टक्के खर्च महानगरपालिका करणार आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीत यापूर्वी २००७ मध्ये जवाहरलाल नेहरू नगरोथ्थान योजनेमध्ये भूमिगत मलनिःसारण वाहिन्यांचे काम करण्यात आले होते.
त्यानंतरच्या काळात शहराचा झपाट्याने विस्तार झाला व नवीन वस्त्यांमध्येही भूमिगत मलनिःसारण वाहिन्यांची आवश्यकता निर्माण झाली. शिवाय २००७ मध्ये ज्या भागांमध्ये मलनिःसारणाची योग्य व्यवस्था होती,ते भाग तत्कालीन योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते.परंतु,मागील काही वर्षात त्या परिसरांमध्ये हे काम करण्याची गरज निर्माण झाली होती. त्याअनुषंगाने नवीन प्रस्तावामध्ये सदरहू भागामधील काम देखील समाविष्ट आहे. महानगरपालिकेच्या प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होते आहे.
*मुख्यमंत्र्यांनी पुढील प्रक्रिया गतिमानतेने पूर्ण करावीः अशोकराव चव्हाण*
दरम्यान,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या निर्णयाबाबत ट्वीट करून मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची पुढील प्रक्रिया गतिमानतेने पूर्ण करावी,अशी मागणी केली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी नमूद केले आहे की,नांदेड शहरातील ३३२ कोटींच्या मलनिःसारण प्रकल्पास सचिव पातळीवरील राज्यस्तरीय तांत्रिक समितीने आज मंजुरी दिली.या प्रकल्पांतर्गत शहरात ४४० किलोमीटर लांबीच्या मलनिःसारण भूमिगत वाहिन्या टाकल्या जाणार आहेत.मविआ सरकारच्या काळात हा प्रस्ताव सादर करून त्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो.
तांत्रिक मंजुरी मिळाल्याने नांदेड-वाघाळा मनपाच्या मलनिःसारण प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार झाला असून,मा. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन पुढील प्रक्रिया गतिमानतेने पूर्ण करावी.तसेच नांदेड जिल्ह्यातील विकासकामांना दिलेली स्थगिती उठवावी,अशी मागणी आहे.