घरोघरी तिरंगासाठी स्वाभिमानाने पुढे या – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड (जिमाका) दि. 4 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून प्रत्येक विभाग प्रमुखांनी अधिकाधिक लोकांशी संपर्क साधून त्यांचा सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी व सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील कोणत्याही गरिबाला तिरंगा मिळाला नाही म्हणून त्याच्या आनंदावर विरजन पडता कामा नये. दारिद्रय रेषेखालील कुटूंबांनाही तिरंगा लावता यावा यासाठी उद्योजकांनी सामाजिक उत्तदायित्वाच्या माध्यमातून तिरंगा देण्यासाठी पुढे सरसावे, असेही आवाहनही त्यांनी केले. या मोहिमेच्या प्रसारासाठी प्रत्येक तहसिल कार्यालय आणि पंचायत समिती यांना शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक तहसिलदार व पंचायत समिती यांनी विविध उपक्रम हाती घेऊन या उपक्रमाची अधिकाधिक प्रसिद्धी करावी, अशा सूचनाही त्यांनी सर्व तहसिलदारांना दिल्या.
जिल्हा परिषदेतर्फे विशेष ग्रामसभा बोलविण्याबाबत निर्णय झाला आहे. प्रातिनिधीक गावांमध्ये हा ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या असून घरोघरी तिरंगा ग्रामीण भागातील अधिकाधिक घरांवर लावण्याबाबतचे नियोजन केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. नांदेड महानगरातील लोकांचा अधिक सहभाग घेण्याच्या उद्देशाने मनपा तर्फे येत्या 10 ऑगस्ट रोजी भव्य मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी दिली. याचबरोबर विविध उपक्रम मनपा तर्फे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0000