पंढरीची वारी,एसटी आपल्या दारी; ४५ वारकरी प्रवाशांसाठी गावातूनच सोडण्यात येणार बस – आगार प्रमुख डफळे
किनवट (प्रतिनिधी)
यंदाच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकरी प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून ४५-४५ वारकरी प्रवाशांचा समुहा असेल तर थेट गावातूनच पंढरपूर साठी बस सोडण्यात येईल अशी माहिती किनवटचे आगार प्रमुख सचिन डफळे यांनी दिली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरचे पांडुरंग यांच्या दर्शनाकरिता वारकरी समुदाय मोठ्या भक्तिभावाने आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जात असतो. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये व त्यांना प्रवासासाठी सोयी सुविधा मिळाव्यात याकरिता महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी जर ४५ चा समूह असेल तर एसटी थेट आपल्या गावा पासूनच पंढरपूरला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आपल्याला जवळच्या आगाराशी संपर्क साधावयाचा आहे, किनवट तालुक्यातील जनतेने किनवट आगाराशी किंवा वाहतूक निरीक्षक साईनाथ मुंडे (९७६६९१५४०९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आगार प्रमुख डफळे यांनी केले आहे. तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व भाविक भक्तांनी ४५-४५ च्या समूहाने पंढरपूर यात्रा करावी,तसेच आरामदायी व सोयीयुक्त, सुरक्षित प्रवासासाठी एसटीनेच प्रवास करावा असे आवाहन आगारप्रमुख सचिन डफळे यांनी केले आहे.