खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नास यश; नाफेडच्या हरभरा खरेदीस १८ जूनपर्यंत मुदतवाढ
किनवट/ प्रतिनिधी: ता.३०: नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांकडुन हमी भावाने धान्य खरेदी केली जाते. यंदा हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली,नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हरभरा पिक घेण्यात आले आहे. शासन नियमाप्रमाणे १७ मे २०२२ पर्यंत हमी भावाने खरेदीची तारीख संपल्याने नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आली होती. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील व राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन नाफेडच्या खरेदी केंद्रास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीस यश आले असून, नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीसाठी आता १८ जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खासदार हेमंत पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
नाफेड अंतर्गत हमी दराने हरभरा खरेदी करण्यात येणार असल्याने हिंगोली लोकसभा मतदारसंघासह महाराष्ट्रातील लाखो क्विंटल हरभरा शेतकऱ्यांकडे पडून असलेला हरभरा पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठविला जाणार आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता अनेक शेतकरी संघटना, शेतकरी, व्यापारी यांनी खासदार हेमंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नाफेडचे खरेदी केंद्रा पुन्हा सुरु व्हावे यासाठी निवेदने दिली होती. त्यांच्या निवेदनाची दखल घेत खासदार हेमंत पाटील यांनी १९ मे रोजी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील व राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतल्यामुळे नाफेडच्या खरेदी केंद्रास मुदतवाढ दिली आहे.
याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री मा. ना. श्री. नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री मा. ना. श्री. पियुष गोयल , राज्याचे कृषी मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे , राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, मंत्री मा. ना. श्री. छगन भुजबळ, तसेच राज्याचे सहकार व पणन, मंत्री मा. ना. श्री. बाळासाहेब पाटील, यांचे आभार मानले आहेत.
हरभरा पिक घेतल्यानंतर शेतकऱ्यानी पुन्हा पेरणीपूर्व मशागतीची कामे हाती घेतली आहेत. जूनपूर्वी शेतीची मशागत होणे गरेजे आहे. मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशात पुरेसा पैसा असतो. हरभरा पिकाच्या विक्रीतून शेतकऱ्यांना तो पैसा मिळतो. मात्र नाफेडमार्फत सुरु असलेली हमी दराने खरेदी अचानक बंद करण्यात आली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी यात जातीने लक्ष घालुन शेतकऱ्यांच्या हरभरा पिकाची पुन्हा हमी दराने खरेदीस मुदतवाढ मिळावी यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे यांची भेट घेऊन लेखी मागणी केली होती. ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.