गोरगरीबांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठीच नांदेड येथे शैक्षणिक संस्था उभारण्यावर भर*पालकमंत्री अशोकराव चव्हाण* *नांदेड येथे नर्सिंग कॉलेजच्या शुभारंभासह इतर सहा प्रकल्पांचे भूमिपूजन-लोकार्पण
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.28.नांदेडच्या शिक्षण क्षेत्राला भक्कम पायावर उभे करण्याचा ध्यास घेण्यापाठीमागे स्व. शंकरराव चव्हाण यांची दूरदृष्टि आहे.
त्याकाळी नांदेडची गरज ओळखून खाजगी वैद्यकीय महाविद्यालयासह इतर शैक्षणिक संस्थाही सुरू करण्याबाबत विचार केला होता.तथापि यात इथल्या गोर-गरीब बहुजन वर्गातील मुलांना खाजगी संस्थांमध्ये शिक्षण घेणे परवडणार नाही,त्यांना शिक्षणाच्या संधी मिळणार नाहीत हे लक्षात घेऊनच ज्या काही शैक्षणिक शासकीय संस्था येथे आणता येतील,उपलब्ध करून देता येतील त्यावर प्राधान्याने आम्ही भर दिला.यातूनच शिक्षणाच्यादृष्टिने नांदेड हे महत्वाचे केंद्र साकारू शकले, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
नांदेडच्या शैक्षणिक सेवा-सुविधांना अधिक भक्कम करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुल,शासकीय अध्यापक महाविद्यालय इमारत, शंभर प्रवेश क्षमता असलेल्या मुलींचे वसतीगृह इमारतीचे भूमिपूजन, डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय परिसरात बीएससी नर्सींग कॉलेज शुभारंभ, प्रशासकीय व ग्रंथालय इमारतीच्या आधुनिकीकरण,सौंदर्यीकरण कामांच्या शुभारंभ,धनगरवाडी येथील दोनशे क्षमतेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर जयश्री पावडे, कुलगुरू डॉ.उद्धव भोसले,जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर,मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदींची उपस्थिती होती.
आज भूमिपूजन झालेल्या विविध शैक्षणिक प्रकल्पासाठी वर्षभरापासून नियोजन सुरू होते.
उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सर्व प्रक्रिया तत्पर पूर्ण करून दिली.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील विविध प्रकल्पांसाठी भरीव पाठिंबा दिल्याचे अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले. विकासाची प्रक्रिया ही निरंतर सुरू राहिली पाहिजे. कालागणिक यात बदलही झाले पाहिजेत.जनतेच्या कल्याणासाठी याचे उत्तरदायित्व असते. हे लक्षात घेता आजवर कोणत्याही विकासाच्या कामात मी राजकारण आणले नाही, आणत नाही,असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करून त्यांनी विकास प्रक्रियेच्या सर्व समावेशक योगदानाला अधोरेखीत केले.
वाढत्या नांदेड महानगराच्या गरजांना लक्षात घेऊन येथील वैद्यकीय सेवा-सुविधाही भक्कम असल्या पाहिजेत यावर आमचा भर आहे. सर्वसामान्य लोकांना विविध आजारांवरील उपचार परवडले पाहिजेत.आजही कॅन्सरवरील उपचारासाठी, न्युरॉलॉजी,कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी सारख्या आजारांवर उपचाराच्या चांगल्या सुविधा आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध होण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत.वैद्यकीय क्षेत्रात स्टाफ-नर्सेसची अत्यावश्यकता आपण कोरोनाच्या काळात अनुभवलेली आहे.या भागातील विद्यार्थी व विद्यार्थींनींना या क्षेत्रातले चांगले शिक्षण मिळावे यासाठी शासकीय परिचारीका महाविद्यालयाची उपलब्धी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.ट्रॉमा केअर सेंटर, अग्निप्रतिबंधक यंत्रणा, फिजीओ थेरपी यासह रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या इतर शैक्षणिक अभ्यासक्रमाची नितांत आवश्यकता आहे. एका बाजुला शैक्षणिक सेवा-सुविधा भक्कम करीत असतांना त्यांची स्वच्छता आणि निगा ही तेवढीच महत्वाची आहे. यासाठी पर्यायी विचार करून जबाबदार संस्थांना ही कामे सोपविली पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नांदेडच्या या वैभवासाठी व विविध शैक्षणिक संस्थांसाठी विष्णुपूरी येथील शेतकऱ्यांनी दिलेले योगदान याची तुलना करता येणार नाही. आज त्यांच्या योगदानामुळेच हे सर्व प्रकल्प साकारू शकले, असे सांगून त्यांनी विष्णुपुरीच्या भूमिपूत्रांबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त केली.
*समृद्ध शैक्षणिक साहित्य परंपरेसह नांदेडला परिपक्व राजकीय कार्यसंस्कृतीचाही वारसा*
*उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत*
मराठवाड्याच्या एका काठावर असूनही नांदेड जिल्ह्याला एक समृद्ध शैक्षणिक-साहित्यिक वारसा लाभलेला आहे.
शिक्षणाचा यशस्वी नांदेड पॅटर्न म्हणूनही आम्ही या जिल्ह्याकडे पाहतो. या साऱ्या वैभवासह या जिल्ह्याला माजी केंद्रीय गृह मंत्री स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांनी एक समृद्ध आणि परिपक्व राजकीय संस्कृती दिली आहे. याचा वारसा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी समर्थपणे सांभाळून सर्वसामान्यांच्या विकास कामांचा नवामापदंड निर्माण केला आहे, या शब्दात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गौरव केला. मराठी भाषा संवर्धनासाठी आणि वाचन चळवळ अधिक रुजावी,वाढावी यादृष्टिकोणातून नांदेड येथे सर्वात चांगले मध्यवर्ती ग्रंथालय उभे राहील यासाठी सर्वतोपरी मदत करू असे त्यांनी जाहीर केले.
शिक्षणाचे प्रवाह हे मातृभाषेतून विकसित होतात. मराठी ही आपल्या महाराष्ट्राची राष्ट्रभाषा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपले सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.
कालच आपण साजऱ्या केलेल्या मराठी भाषा दिनाच्या औचित्याने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतची घोषणा होईल अशी साऱ्यांचीच अपेक्षा होती. आता याची अधिक प्रतिक्षा न करता आम्ही महाराष्ट्रात स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ साकारू असे त्यांनी जाहीर केले.
नांदेड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मी मागच्यावेळेस भेट देऊन पाहणी केली होती. येथील सर्व सुविधा, वास्तुरचना पाहून मलाही रत्नागिरीमध्ये असे महाविद्यालय का असू नये असे वाटले. मी त्यादृष्टिने प्रयत्न सुरू केले व आता तेथेही असे महाविद्यालय साकारले जात आहे.
नांदेड मधील प्रत्येक पॅटर्न कोकणासाठीही आवश्यक असून जी विकास कामे पालकमंत्री या नात्याने अशोकराव चव्हाण यांनी नांदेडमध्ये घेतली तशीच कामे आम्ही रत्नागीरीतही पूर्ण करीत असल्याचे त्यांनी निसंकोचपणे सांगितले.कोकणासाठीही सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने अशोकराव चव्हाण यांनी मदत केली आहे.तेथे समुद्र किनाऱ्यावर गावे अधिक आहेत.
तेथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी 275 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी केला.
स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावे असलेल्या सर्व सोई-सुविधायुक्त स्वतंत्र अभ्यासिकेच्या व इतर शैक्षणिक कामांचे भूमिपूजन करण्याची मला संधी मिळाली याचा मनापासून आनंद आहे. विशेषत: आपले राजकीय ज्येष्ठत्व बाजुला सारून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी मला व आमच्या सहकाऱ्यांना पुढे केले. या सर्व भूमिपूजन समारंभास उपस्थित राहणे हे मी माझ्या राजकीय जीवनातील एक महत्वपूर्ण योगायोग असल्याचे प्रतीक समजतो,असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.
यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, संशोधनचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांची समयोचित भाषणे झाली.