आ. अंतापूरकर, मंडगीकर व खा. सातव यांच्या निधनामुळे बहुजन चळवळीला हादरा- भारत खडसे
नांदेड- देगलूर- बिलोली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव मंडगीकर व हिंगोली मतदार संघातील खा. राजीव सातव यांच्या निधनामुळे बहुजन चळवळीला मोठा हादरा बसला असून बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे तीन दिग्गज नेते गेल्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे मत राष्ट्रीय मातंग संघाचे संस्थापक अध्यक्ष भारत खडसे यांनी व्यक्त केले.
आज दि. १७ मे २०२१ रोजी दुपारी २ वाजता अण्णाभाऊ साठे चौक नवा मोंढा, नांदेड येथे जिल्ह्यातील राष्ट्रीय मातंग संघाच्यावतीने समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बिलोली- देगलूर विधानसभा मतदार संघाचे आ. रावसाहेब अंतापूरकर, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव मंडगीकर व हिंगोली जिल्ह्याचे खासदार ऍड. राजीव सातव यांच्या निधनाबद्दल शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना राष्ट्रीय मातंग संघाचे संस्थापक अध्यक्ष भारत खडसे म्हणाले की, वरील तिन्ही लोकप्रतिनिधी मराठवाड्यातील बहुजन व दलित समाजाकरीता चळवळीत काम करणार्यांना कार्यकर्त्यांना नेहमी मार्गदर्शन करत होते. मराठवाड्यामध्ये कोणावरही अन्याय झाला तर धावून जावून ते प्रकरण समेटाने निवारण्याचा प्रयत्न करीत असत. तसेच फुले- शाहू- आंबेडकर- अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या विचारांचा वारसा चालवणारे हे बहुजन समाजातील लढवय्ये नेते काळाने आपल्यापासून हिरावून घेतले असून त्यांची समाजाला वेळोवेळी उणिव जाणवणार असल्याचे भारत खडसे यांनी शोकसभेत सांगितले. यावेळी या तिन्ही नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी खंडेश्वर लिंगायत, उत्तमराव जाधव, बालाजीराव जोगदंड, संभाजी शिंदे, संतोष सुर्यवंशी, माधवराव जोगदंड, बाबुराव गायकवाड, विश्वांभर हनमंते, संजय धसाडे, शिवाजी नुरुंदे, पाडाजी सुर्यवंशी, संतोष साठे, प्रकाश खडसे, साहेबराव गजभारे, बिंदू नाईक यांच्यासह मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.