गोदावरी नदीकाठी अवैध वाळू उपसा करणारे २५ तराफे जाळले;महसूल विभागाची कारवाई
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:राज्य शासनाने वाळूचा अवैध उपसा थांबविण्यासाठी नवीन वाळू धोरण जारी केले तरीही नांदेडच्या गोवर्धनघाट येथील गोदावरी नदी पात्रातून तराफेच्या साहाय्याने वाळूचे अवैध उत्खनन बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावेळी तराफ्यावरून वाळू नदीकाठावर आणले जात असताना 25 तराफे नदी पात्रातून बाहेर काढून जाळण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी अवैधरित्या आणि बेकायदेशिररित्या वाळू उपसा करणाऱ्यां – विरूद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान,नांदेड मधील गोवर्धन घाट जूना पूल येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाने सकाळी अकरा वाजल्यापासून कारवाईस सुरुवात केली.
गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी पथक स्थापन करून उपजिल्हाधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१० गुरूवारी रोजी ११ ते १ च्या दरम्यान अवैध वाळू उपसा करताना आढळून आलेल्या २५ तराफे पकडून जाळण्यात आले.
यावेळी अर्धापुरच्या तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्या उपस्थितीत गोदावरी नदीच्या पात्राजवळ अवैध वाळू उपसा करणारे 25 तराफे आढळून आल्याने मंडळ अधिकारी शेख शफीयोद्दीन,तलाठी रमेश गिरी, चंद्रकांत महाजन,तलाठी रवी पल्लेवाड,नारायण गाढे यांच्यासह सोपान गाढे,गौतम काळबांडे यांनी सर्व तराफे नदी पात्रातून बाहेर काढून जाळून टाकल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी तहसील अंतर्गत पथक स्थापन करण्यात आले असून त्याद्वारे कार्यवाही करण्यात येत आहे.
अवैध वाळू तस्करीने गोदावरी नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे वाहून आलेली वाळू तराफ्याच्या साह्याने गोळा करण्याचे काम वाळू तस्कारांकडून सुरू होते. दिवस उजाडला की वाळू तस्करांचे गोदावरी नदीकाठी वाळू गोळा करण्यास सुरूवात होते.याबाबत अनेकदा कारवाई करूनही वाळू उपसा करण्याचे काम सुरूच होते. त्यामुळे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नांदेड तहसीलच्या पथकाने ही कारवाई केली.
नदीपात्रात असलेले तराफे काढून घ्यावेत तसेच अवैध वाळू उपसाविरुध्दची मोहीम आणखी तीव्र करण्यात येवून दोषींवर फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.