सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनचे माहूर गडावरील आंदोलन पेटले सीटूचे राज्य महासचिव कॉ.एम.एच.शेख यांचा दोन दिवस माहूर मध्ये मुक्काम
नांदेड : आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या श्री किर्तीकीरण पुजार (भा.प्र.से.)यांच्या विरोधात लाल बावट्याने दंड थोपटले असून कर्मचाऱ्यांच्या विरोधात जाणाऱ्या व वादग्रस्त विश्वस्तांचे ऐकणा-या सहाय्यक जिल्हाधिका-यांचा ऐन प्रजासत्ताक दिनी शिमगा होताना दिसला.
अ.भा.किसान सभा,एसएफआय व सीटूच्या वतीने थेट मुख्यमंत्री व राज्य सचिवांकडे गंभीर तक्रार करण्यात आली आहे.
मागील पंधरा वर्षापासून संस्थानचे आदेशाने सेवेत कार्यरत असणाऱ्या ७० कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती आदेश देऊन मागील फरकासह पगारवा वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यासह इतरही मागण्या कर्मचाऱ्यांनी सीटूच्या नेतृत्वाखाली केल्या आहेत.
दि.१० जानेवारी पासून माता रेणुकेच्या पायथ्याशी संस्थानच्या ७० कर्मचाऱ्यांचा सत्याग्रह सुरू आहे.
दोन वर्षापूर्वी पाच दिवस कर्मचाऱ्यांनी असाच सत्याग्रह गडावर केला होता.तेव्हा तत्कालीन सचिवांनी लेखी आश्वासन देऊन सत्याग्रह थांबविला होता.परंतु दोन वर्षे संपून सुद्धा मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे कर्मचारी पुन्हा मागील सतरा दिवासापासून कडाक्याच्या थंडीमध्ये सत्याग्रह करीत आहेत.
करोडो रूपयांची उलाढाल होणाऱ्या संस्थानमध्ये कर्मचाऱ्यांना अल्प पगारावर कामे करून घेऊन कायम नियुक्ती पत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात दि.२५ जानेवारी पासून अ.भा.किसान सभा,सीटू व एसएफआय च्या वतीने माहूर तहसिल कार्यालया समोर १५२ महिला पुरुष्यांनी अमरण उपोषण सुरू केले असून सीटूचे महाराष्ट्र राज्य महासचिव कॉ.ॲड.एम.एच.शेख हे दोन दिवसापासून माहूर मध्ये तळ ठोकून आहेत.तसेच जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभणे,सीटू राज्य सचिव तथा जिल्हाध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार यांची उपस्थिती देखील माहूर गडावर आहे.
सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथाराज्य सचिव कॉ.डॉ.डी.एल.कराड हे सतत संस्थानचे सचिव श्री किर्तीकिरण पुजार यांच्या संपर्कात आहेत व त्यांनी संबंधितांना निवेदने देखील दिली आहेत.
माहूर गडावर मागील सतरा दिवसापासून ७० कर्मचाऱ्यांचा सत्याग्रह व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला सीटू सह भातृभावी संघटनांच्या १५२ लोकांचे अमरण उपोषण नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
सीटूचे जिल्हा सरचिटणीस तथा नांदेड जिल्हा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड हे सदरील आंदोलनाच्या नेतृत्वामध्ये आहेत आणि दि.२६ जानेवारी रोजी त्यांचे बोलणे नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री तथा माजी मुख्यमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्याशी फोनवरून दहा मिनिटे बोलणे झाले आहे.ना.चव्हाण सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट तथा संस्थानचे सचिव यांना बोलून कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती आदेश देणे व इतर मागण्या सोडविण्यासाठी सूचना करतो असे म्हणाले आहेत.
जिल्हा प्रशासनातील पदसिद्ध अधिकारी (सचिव) हे मानमानी करीत असल्यामुळे अमरण उपोषणाची नोटीस थेट मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आली आहे.
कॉ.ॲड.एम.एच.शेख यांनी देशातील व राज्यातील अनेक देवस्थानाती मा.न्यायालयाचे कामगार कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागलेले निर्णय सादर केल्यामुळे लवकरच योग्य निर्णय होईल अशी अपेक्षा आंदोलकांना आहे.
सदरील आंदोलन यशस्वी करण्यासाठी किसान सभेचे कॉ.शंकर सिडाम,कॉ.किशोर पवार,कॉ.प्रल्हाद चव्हाण,कॉ.राजकुमार पडलवार,कॉ.वसंत राठोड,एसएफआयचे प्रफुल कऊडकर,विशाल नरवाडे,अभि खंदारे,सीटूचे कॉ.कालीदास सोनुले,कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.शीलाताई ठाकूर तर श्री रेणुका देवी संस्थान स्थानिक कमिटीचे कॉ.श्रावण जाधव,कॉ.अरुण घोडेकर,कॉ.गजानन घूगे,कॉ.अरविंद राठोड,कॉ.विनोद कदम आदी प्रयत्न करीत आहेत.
तर अ.भा.किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष कॉ.अर्जून आडे हे सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्याशी बोलून निवेदन देणार आहेत.
दि.२६ जानेवारी रोजी माजी जि.प.नांदेड उपाध्यक्ष समाधान जाधव व किनवट तालुका माकप सचिव कॉ.स्टॕलिन आडे यांनी माहूर तहसिल येथे येऊन आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
श्री रेणुका देवी संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर मागण्यांची पूर्तता लवकर झाली नाहीतर शकडो महिला पुरुष थेट तहसिलदार माहूर यांच्या दालनात ठिय्या मांडून बसण्याची शक्यता आहे.
संस्थानातील कर्मचारी व सत्याग्रहामध्ये सामील असलेले कॉ.दिलीप जाधव यांच्या छातीमध्ये त्रास होत असल्याने त्यांना माहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु माहूर येथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना प्रथमोपचार करून संदर्भ चिठ्ठी देऊन पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविले आहे.
एकंदरीतच संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर मागण्या सोडविण्यास जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे महागात पडू शकेल अशी परिस्थिती आहे.