धक्कादायक: देशी बनावटीच्या पिस्टलसह आरोग्य कर्मचाऱ्यास अटक* *गावठी पिस्टल जप्त; वजिराबाद डी.बी.पथकाची कारवाई
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.24.जिल्यातील बिलोली येथून देशी बनावटीच्या पिस्टलसह एका आरोग्य कर्मचाऱ्यास पोलिसांनी बिलोली रुग्णालयातून अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्टल जप्त करण्यात आले आहे.वजिराबादच्या डी. बी. पथकाने ही कारवाई केली आहे.
जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडु नये या अनुषंगाने पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे,पोलीस उपअधिक्षक (शहर) चंद्रसेन देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्वाधीन अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत.सदर सुचनांप्रमाणे पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड येथील जगदीश भंडरवार,पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजिराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना नियमितपणे अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करण्याची मोहीम हाती घेऊन गुन्हेगार चेक करून त्यांच्या हालाचालीची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
याच अनुषंगाने वजिराबाद येथील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना माहिती मिळाली की,दिनांक 19 जानेवारी रोजी गोवर्धनघाट परिसरामध्ये एक इसम आपले ताब्यात देशी पिस्टल बाळगुन लोकांना धमकावित होता.सदर बातमीवरुन जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक,पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांनी गुन्हे शोध पथकाचे संजय निलपत्रेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार दत्तराम जाधव, पोना विजयकुमार नंदे, मनोज परदेशी,गजानन किडे,शरदचंद्र चावरे,पोकों संतोष बेलुरोड, व्यंकट गंगुलवार,शेख ईमान यांना नमुद गुन्हेगाराबाबतची माहिती काढुन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
सदर सुचनेप्रमाणे काल दिनांक 24 रोजी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पिस्टल बाळगणाची माहिती काढून त्यास ग्रामीण रुग्णालय बिलोली येथुन ताब्यात घेतले. त्यास पिस्टल बाबत विचारणा करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी एक देशी पिस्टल नांदेड येथे असल्याचे सांगितले आणि पंचासमक्ष ते काढुन दिले. पोलिसांनी हे पिस्टल जप्त केले आहे.
सदर प्रकरणी पोहेकॉ दत्तराम जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द कलम 3/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमेश मदनसिंग बीडला (वय 29 वर्ष, राहणार जुना कौठा नांदेड) असे आरोपीचे नाव असून तो आरोग्य विभागात कार्यरत आहे.सदर गुन्ह्याचा तपास सपोनि संजय निलपत्रेवार हे करीत असुन आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कारवाईबाबत वरिष्ठांनी त्यांची प्रशंसा केली आहे.