गोरबंजारा समाजाचे प्रजावत्सल समाजसुधारक बळीराम हिरामण पाटील
किनवट: आज त्यांचे ४९ वे पूण्य स्मरण, त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन ! या महान विभूतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा छोटेखानी घेतलेला हा आढावा.
अनादी काळापासून भारतात अनेक सामाजिक संस्कृती, रितीरिवाज, प्रथा,परंपरा ,जगणे,राहणे, वागणे तग धरून आहेत. या सर्व संस्कृतीपेक्षा स्वतंत्र जगावेगळी संस्कृती जगणारा, जोपासणारा समाज म्हणजे गोरबंजारा समाज होय. शेकडो वर्ष गायी गुरांच्या पाठीवर अन्नधान्य, मिठमसाला, खारिक खोबरा याचा व्यापार करत देशाच्या अष्ट दिशेला भटकंती करत हा लढाऊ, बाणेदार समाज मोठ्या कष्टाने स्थिरस्थावर झाला.
हा समाज स्थिरस्थावर व्हावा, इतर समाजाच्या पंगतीत जाऊन बसावा, यांना स्वतंत्र अस्तित्व असावे, हक्काचे गाव असावे ही विचारसरणी काही गोर विचारवंताच्या सुपिक मनःचक्षूत बळाऊ लागली. त्यापैकीच गोरबंजारा समाजाचे मसीहा स्मृतिशेष बळीरामजी पाटील (राठोड) हे होत. अनेक मानापमान सहन करून समाजाला गतीमान बनविण्याचे महतप्रयास त्यांनी केले. ते बुद्धिमान, अभ्यासू, विद्वान होते. त्यांना भारतातील अनेक भाषा अवगत होत्या. ते गोरबंजारा समाजाचे आद्य समाजसुधारक तथा साहित्यिक, उद्योगप्रिय त्याचबरोबरच कमालीचे हिशोबनिस, प्रजावत्सल होते. त्यांच्या कार्याचा छोटेखानी घेतलेला आढावा म्हणजे सदर लेख होय.
या आद्य गोर समाजसुधारकाचा जन्म वडील हिरामण आणि आई टोगलीबाई यांच्या पोटी व-हाडातील यवतमाळ जिल्ह्यात १८९८ साली महाळुंगी या गावी झाला. वडील हिरामण राठोड यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गायी गुरं आणि नोकर चाकरांचा लवाजमा होता. आपल्या गुरांची निगराणी व्हावी या उद्शाने ते पैनगंगा नदी ओलांडून माळरान पठारावर आले व मांडव्य ऋषीच्या कुशीत स्थिरस्थावर झाले. येथेच ” मांडवी ” नावाचे गाव त्यांनी वसविले.
पैनगंगेच्या अलीकडील भाग हा मराठवाडा म्हणून ओळखल्या जात होता. संपूर्ण मराठवाडा निजाम राजवटीच्या अधिपत्याखाली होता. तत्कालीन निजाम सरकारने यांच्या गायी गुरांचा प्रचंड फौजफाटा पाहून त्यांनी मांडवी परिसरातल्या पंचक्रोशीतील ईजारदारी व पाटीलकी देऊन त्यांचा बहुमान केला.
निजामांनी पाच हजार एकरची ईजारदारी व पाटीलकी, बावन गावाचा ईजारा, त्यांचे वडिल हिरामण पाटील यांना १९१३ – १४ च्या दरम्यान दिला. तेंव्हा बळीरामजी पाटील अवघे १५ – १६ वर्षाचे होते. त्याच दरम्यान वडिलांचे (हिरामण पाटील) छत्र हरवले. तेंव्हा गोर बंजारा समाज प्रचंड हाल, अपेष्टा,मानहानी,निंदा,कुचेष्टा याला सामोरे जात होता. हे त्यांना असह्य होत होते. राना वनात, दरी कपारीत राहणाऱ्या माझ्या समाजाला गतवैभव प्राप्त व्हावे याचा विडा त्यांनी उचलला. १९२० – १९३६ असे बरेच वर्ष त्यांनी भारतभर दौरे केले. तत्कालीन बॉम्बे, मद्रास, म्हैसूर कलकत्ता, पंजाब अशा वेगवेगळया गैझेटियरचा, जनगणनेचा अभ्यास त्यांनी केला. हजारो पुरावे त्यांनी गोळा केली. बंजारा समाजातील समृद्ध असा, *”गोर बंजारा लोकांचा इतिहास “* हा महान एतिहासिक ग्रंथ त्यांनी लिहिला. हैद्राबाद, म्हैसूर येथिल १९२१ व १९२६ साली भरलेल्या शिक्षण सभेला ते जातीने उपस्थित राहून त्या सभेला वाहून घेतले.
हरित क्रांतिचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेबांना वाटेल ती मदत केली. नाईक साहेबांच्या हाताला धरून भारत भ्रमंतीला नेले. देशातील काना कोपर्यात राहणाऱ्या गोरबंजारा समाजाची ओळख करुन दिली. त्यांना थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदा पर्यंत बसविण्याचे महतप्रयास या थोर समाजसुधारकांने केले. स्व. सुधाकरराव नाईक (महाराष्ट्रचे मुख्यमंत्री) हे त्यांचे जावई होत .
स्वतःचे जेष्ठ पुत्र उत्तमराव राठोड यांना आमदार (नंतर खासदार झाले) बनविले. मांडवी गावात व परिसरात बहुमूल्य सुधारणा त्यांनी केली. परिसरातील व गावातील प्रत्येक जाती, धर्मात त्यांनी सुसूत्रता आणली. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३५ साली स्वतःच्याच घरात शाळा सुरू केली. अमरावतीहून एक शिक्षिका आणली, तालुक्यातील रंजल्या गांजल्या लोकांची सेवा सुश्रृषा व्हावी याकरीता दवाखाना (डिस्पेन्सरी) व डॉक्टर आणले , मांडवी, (आदिलाबाद तेलंगणा) येथे जिनिंग प्रेसिंगची स्थापना करून हजारो लोकांना रोजगार दिला. स्वातंत्र्यानंतर १९५५ साली वडिलांच्या नावे हिरा वाचनालयाची स्थापना केली.
गावातील लोकांनी शिक्षण, वाचनाची कास धरली पाहिजे यासाठी त्यांनी शैक्षणिक, सामाजिक मेळावे भरवून समाजामध्ये जनजागृती केली. गावाच्या चारही दिशेला स्वखर्चातून विहिरी खणून पाण्याची सोय केली. रस्त्याच्या दोन्ही कडेला विविध प्रकरची झाडे लावली आणि जनावरांकरीता पाणवठे उभे केले.
गावोगावी , वाडी, तांडे, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान संपूर्ण भारतभर फिरून समाज जागृती व प्रबोधनाचे कार्य त्यांनी केले. पारंपरिक केशभूषा आणि वेशभूषा योग्य दिसावी म्हणून त्यांनी समाजाला वस्त्रप्रावरणाचे महत्व पटवून देऊन वेषांतर करावयास लावले. त्याचे उलट परिणाम असे झाले की, लोक निषेध करावयास लागले. विदर्भ ,तेलंगणा स्व तालुक्यातील पालाईगुडा, दहेली ईत्यादी तांडावासीयांनी पाटील साहेबांचा जाहीर निषेध केला. अनेक सण समारंभ उत्सव प्रसंगी भयंकर असे अपमान केले. *”तांडो मांडवीरो चाल बिगाडो “* अशी निषेधात्मक गीत रचना करून ठिक ठिकाणी गायीली जाऊ लागली. या प्रचंड निंदा नालस्तीला त्यांना सामोरे जावे लागले. हे सर्व त्यांनी निमूटपणे सहन केले.
कष्टाळूवृत्ती आणि सहृदयता हा त्यांचा मुख्य बाणाच होता. ते स्वतःला सतत कार्यमग्न ठेवत असत. आपल्या विविध कामाच्या व्यस्ततेतून त्यांनी वाचन, लेखनाची मोठी आवड जोपासली. वाचन, लेखनावर त्यांचे भयंकर प्रभुत्व होते. त्यांनी गोरबंजाराचा इतिहास या प्रसिद्ध ग्रंथा बरोबरच “महाळुंगी ते मांडवी” हा ग्रंथ लिहिला. नंतर १९६६ साली “आलेख समाज प्रगतीचा ” हे आत्मचरित्र लिहिले. त्यांचे जावई मा. मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी १७ जानेवारी १९९६ साली पूनर्रप्रकाशित केले.
बळीरामजी पाटील हे भटके विमुक्त, मागासवर्गीय जमातीतले भारतातील पहिले जहागीरदार होत. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, सुधारणा विषयक कार्य फार उत्तुंग आहेत. ग्रामीण भागातील वाडी, वसती, गुडा, पोडा, तांड्यातील विद्यार्थांना महाविद्यालयीन शिक्षण मिळावे म्हणून आपले जेष्ठ पुत्र आमदार उत्तमराव राठोड यांना सांगून किनवट येथे तालुक्याच्या ठिकाणी, *शैक्षणिक वर्ष १९७१-१९७२ मध्ये किनवट शिक्षण संस्थेची स्थापना* करावयास लावून तळागाळातील युवकांना शिक्षण सोईस्कर करून दिले.
साहित्याची आणि ग्रंथ संग्रहाची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांच्या चौरंगी कार्यातून घेण्यासारखे, शिकण्या सारखे भरपूर आदर्श आहेत. आजच्या तरूण पिढीला त्यांचे कार्य चैतन्य देणारे आहे. ते एक उत्कृष्ट व्यापारी होते. ते नेहमीच सांगत असत की बांधवांनो,
*”व्यापारी व व्यावसायिक बना “*
आज आम्ही किती व्यावसायिक नि व्यापरी बनलो आहोत हा संशोधनाचा भाग आहे. त्यांच्या कार्याची दख्खल घ्यावयास आज आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत. याचा आत्मक्लेश वाटल्या शिवाय रहात नाही.
माझा समाज परिवर्तनवादी बनला पाहिजे. जगातील वेगवेगळ्या ज्ञानाचे सिद्धांत जोपासला पाहिजे. इतर समाजाबरोबर प्रगती, उन्नतीच्या वाटेला लागला पाहिजे असे प्रगल्भ विचार त्यांचे होते.
आज आमच्या शिकल्या, सवरलेल्या संगणक, इंटरनेट, डाॅल्बी, डिजिटल पिढीला या महान प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाचा विसर पडतो आहे. लेखन वाचनाची आवड कमी झालेली आहे. स्पर्धेच्या युगात आमचा तरुण कमी पडतो आहे. व्यर्थ व अनाठायी खर्चाची उधळपट्टी होतांना दिसत आहे. सामाजिक, धार्मिक आडंबर जोपासून भलत्याच मार्गाला लागला आहे. वेगवेगळे, रंगीबेरंगी पोशाख परिधान करून अंधभक्ती व अंधश्रद्धेला खतपाणी घालतो आहे. अशा अनेक बाबीपायी आमचा तरुण प्रागतिक आणि सैद्धांतिक विचारापासून भरकटतो आहे.
आजच्या आधुनिक पिढीला बळीरामजी पाटील यांचे चरित्र आदर्शवत आहे. या जाज्वल्यमान, परिवर्तनादी, प्रजावत्सल, आद्य समाजसुधारक, साहित्यिक, लेखक, जहागीरदाराचे नाव घेतल्या शिवाय गोरबंजारा बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्य पुढेही जाऊ शकत नाही. याचेही आजच्या मोबाईल, इंटरनेट पिढीला विसर पडता कामा नये.
अतिशय कठीण काळात देश पारतंत्र्यात असतांना १९२० ते १९५२ पर्यंत त्यांनी संपूर्ण भारत भ्रमंती केली. देशातील अनेक गॅझेटियरचा त्यांनी भरपूर अभ्यास केला. तेलगु, उर्दू, इंग्रजी, राजस्थानी, कानडी, मराठी, हिंदी व गोंडी, बंजारी अनेक बोलीभाषा त्यांना अवगत होत्या. अनेक भाषेत असलेली गोरबंजारा समाजाची माहिती मिळविली. बंजारा समाजाची महती व माहिती जी हाती पडेल ती अधाशासारखी मिळविली. ही सर्व माहिती एकत्रित करून एक एतिहासिक असा प्रचंड ख्यातीचा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याचा उल्लेख वर केलेलाच आहे.
इंग्रज राजवटीत गोरबंजारा समाजावर मोठा भयंकर अन्याय झाला. या अन्याय, अत्याचारापायी हा समाज देशोधडीला लागला. जन्मजात गुन्हेगारीचा अमानुष कायदा समाजावर लावल्या गेला. तो अनेक पुराव्यादाखल सिद्ध करून हा समाज व्यापारी, मालवाहतूक करणारा ,मेहनती व कष्टाळू, असा वैभवशाली आहे. हे त्यांनी दिल्ली दरबारी पंतप्रधान नेहरुजींच्या दालनात शिष्टमंडळा समवेत देश स्वातंत्र्यानंतर सरकारला पटवून दिले. हा गुन्हेगारीचा अमानुष, रानटी कायदा सरकारला ३१ ऑगस्ट १९५२ साली सोलापुरात लाखो समाज बांधवा समवेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुजी यांच्या करवी रद्द करावयास भाग पाडले.
अस्थिर समाजाला स्थिर करण्याचे महान कार्य या समाजसुधारकाने केले. समाजाला प्रतिष्ठा नि सन्मान मिळवून देण्या करीता ते अहोरात्र झटले. दरी खोरीत, झाडी जंगलात वसलेल्या समाजाला गावपण मिळवून देण्याचे धाडस या महान प्रजावत्सल व्यक्तिमत्त्वाने केले. देशाच्या कोना कोपर्यात विखुरलेल्या संपूर्ण गोर बांधवाना संगठित करून एकसंघ बनविण्याचे महतप्रयास या महामानवाने केले आहे. वसंतरावजी नाईक यांच्या हाताला धरून भारतभर फिरविले. प्रतापसिंगजी आडे, रामसिंगजी भानावत, बाबूसिंगजी राठोड, धावजी नाईक, चंद्राम गुरुजी, गजाधरजी राठोड, सखाराम मुडे गुरुजी ,हारजी नाईक, उत्तमरावजी राठोड या सर्वांनी केलेले कार्य लोकोत्तर आहेत. म्हणून या सर्व विभूती महानच आहेत. आपले थोरले तचिरंजीव बॅरिस्टर उत्तमराव राठोड यांना आमदार, खासदार बनवून देशाच्या सर्वोच्च संसदेत पाठविले.
स्वतःच्या जहागीरीचा पैसा समाज उत्थानासाठी लावून १९५३ साली ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची स्थापना करण्यात सिंहाचा वाटा त्यांनी उचलला. यवतमाळ जिल्ह्य़ातील दिग्रस तालुक्यात दि. ३० जानेवारी १९५३ साली झालेल्या गोरबंजारा समाजाच्या पहिल्या अधिवेशनाकरीता भरपूर निधी दिला. याचा विसर आजकालच्या समाजधुरीणांना होत असतांना दिसत आहे. अशा महान विभूतींचा विसर होणे दुर्दैवाची बाब आहे.
बळीरामजी पाटील यांचे कार्य समाजाला दिशा देणारे दीपस्तंभा सारखे आहेत. त्यांचे विपूल सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक, औद्योगिक असे चौरंगी कार्य पाहून थोर समाजसेवक विनोबा भावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सेतु माधवराव पगडी, इंग्लंडचे विद्वान हेमंड डार्फ इत्यादी लोकं मांडवी मुक्कामी त्यांना भेटावयास आले. भूदान चळवळीत हजारो एकर जमीन त्यांनी गरीबंना दान केली.
अखिल बंजारा समाजाला शिक्षण, आरोग्य, संस्कृती विषयक समाज प्रबोधन करून मान, सन्मान, अधिकाराने जगण्यासाठी प्रवृत्त केले. अखेर पर्यंत समाजाला परिवर्तनाची दिशा दिली.
अशा या प्रचंड ख्यातीच्या समाजसेवकांची, प्रजावत्सल कनवाळू सुधारकाची दिशाभूल आजच्या तरूण पिढीला व समाज बांधवांना होता कामा नये.
या कर्तबगार व्यक्तीमत्वाने जीवनाच्या अंतापर्यंत समाज सुधारणेचा वसा घेतला. दैदीप्यमान असे सामाजिक, शैक्षणिक कार्य केले. शेती, बागायती, शिक्षण, उद्योग, व्यापार, व्यवसाय केला. रंजल्या गांजल्यांना आपलेसे केले. या दरी कपारीत वसलेल्या गोर गरीब, आदिवासी, भटक्या विमुक्त समाजाची सामाजिक, शैक्षणिक सेवा करीत ते १७ जानेवारी १९७३ साली अखेरच्या मुक्कामी नीजधामास गेले. आज या प्रजावत्सल राजाचे पूण्य स्मरण म्हणूनच अशा कनवाळू, प्रजाहितरक्षक समाजसुधारकाचे कार्य वंदनीय आहे.
**************************************
शब्दांकन : डॉ.वसंत भा.राठोड,मांडवी, किनवट.
मो. नं. : – 9420315409.
**************************************