गोकुंद्यात लसीकरणाची व्यापक मोहीम ; सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत कॅम्प
किनवट :येथून जवळच असलेल्या गोकुंदा ग्रामपंचायत येथे लसीकरणासाठी व्यापक मोहीम आयोजित केली असून सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत कॅम्प लावण्यात आला आहे . तसेच घरघर सर्वेक्षण करून मतदार यादी नुसार घरघर सर्वेक्षण करून लसीकरण केल्या जात आहे. तेव्हा गोकुंद्यातील सर्व लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील लसीकरण कॅम्पला भेट देऊन लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी किनवट येथे लसीकरण संदर्भात नुकतीच आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र बोधडी (बुद्रुक)चे वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मराज पवार यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण पूजार, तहसीलदार डॉ. मृणाल जाधव व गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत गोकुंदा येथे सकाळी 10 ते रात्री नऊ या कालावधीत विशेष लसीकरणाचा कॅम्प आयोजित केला आहे. यासाठी ग्रामविकास अधिकारी प्रवीण रावळे यांनी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांच्या नेतृत्वाखालील सर्व शिक्षक , बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी टठकरोड यांच्या अधिनस्त सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या अधिनस्त सर्व आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर यांचे पथक येथे कार्यरत आहे. प्रत्येक घरी जाऊन मतदार यादी नुसार सर्वांचे सर्वेक्षण करीत आहेत. ज्यांनी अद्यापही लस घेतली नाही त्यांना तिथेच थेट लस देण्यात येत आहे. लस घेतल्यानंतर लगेच माहिती ऑनलाइन भरल्या जात आहे.त्यामुळे लसीकरणाने येथे गती घेतली आहे.