स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेत पात्रतेचं शिखर गाठण्यासाठी “मिशन 500 स्कॉलर” नवोपक्रमाचा प्रारंभ -गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने
किनवट : तालुक्यातून आगामी स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेत पात्रतेचं शिखर गाठण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “मिशन 500 स्कॉलर” नवोपक्रमाचा प्रारंभ गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी उमरी तांडा येथे केला.
दहेली तांडा परिक्षेत्रांतर्गत उमरी (बा), खंबाळा व दहेली केंद्रातील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरी तांडा येथे घेण्यात आलेल्या हस्ताक्षर व रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. पुढे बोलतांना गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने असे म्हणाले की, उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र जाधव यांनी लॉकडाउन असतानाही सप्टेंबर मध्ये वक्तृत्व स्पर्धा व ऑक्टोबरमध्ये सामान्यज्ञान स्पर्धा घेतल्या आणि आज शाळारंभ दिनी बीटस्तरीय हस्ताक्षर व रांगोळी स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना प्रफुल्लित केली आहे. या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून पात्र झालेल्या 101 विद्यार्थ्यांपैकी 14 विद्यार्थी हे एकट्या दहेली तांडा या बीटचे आहेत. याबद्दल त्यांचेसह केंद्रप्रमुख व मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. याच गुणवत्तेच्या वाटचालीला चालना देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या प्रेरणेणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली “मिशन 500 स्कॉलर” हा उपक्रम कल्पक शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र जाधव यांच्या नेतृत्वात तालुक्यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळेसह शासकीय आश्रम व खासगी सर्व शाळांचा समावेश असेल असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश नाईक अध्यक्षस्थानी होते ; तर प्रमुख अतिथी म्हणून मांडवी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर , मानव विकास कार्यक्रम समन्वयक उत्तम कानिंदे, प्रा. मेरसिंग पवार, ग्रामसेवक राठोड , ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार या प्रमुख अतिथीसह केंद्रप्रमुख गंगाधर शेर्लावार व संजय कांबळे यांची मंचावर उपस्थिती होती. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर, मानव विकास कार्यक्रम समन्वयक उत्तम कानिंदे, प्रा. मेरसिंग पवार यांनी विचार मांडले. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पार्णण करण्यात आले. त्यानंतर ग्रथभेट देऊन अतिथींचे स्वागत केले.
आशीर्वाद पवार, जी.बी. नरवाडे, मडावी यांनी हस्ताक्षर स्पर्धेचे व वसुंधरा राऊत, आरती डवले यांनी रांगोळी स्पर्धेचे परिक्षण केले.
यावेळी यशवंत पुढील प्रमाणे : रांगोळी स्पर्धा – प्रथम : श्रुतिका शेपूरवार, द्वितीय : सपना मोहर्ले, तृतीय : साक्षी पवार, प्रोत्साहनपर : प्रतिक्षा वल्लेपवाड, जान्हवी दोनकेवार, हस्ताक्षर स्पर्धा -प्रथम : साक्षी जाधव, द्वितीय : विश्वजीत कांबळे, तृतीय : संस्कार राठोड , प्रोत्साहनपर : कुणाल राठोड, स्वराज चव्हाण या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते परितोषिक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.केंद्रप्रमुख गंगाधर शेर्लावार यांनी प्रास्तविक व शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. बालाजी पिटलेवाड यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर बंडेवार, रुक्मण मंगनाळे, गजेंद्र बोड्डेवार, विठ्ठल कुरमेलकर , गोपाल कनाके , कांबळे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.