कोब्रा कमांडोने दिले पक्ष्याला जीवदान.. गौतम धवने यांची अशीही माणुसकी..
दिग्रस / प्रतिनिधी
आज पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. सोबतच पक्ष्यांच्या विविध प्रजाती लुप्त देखील झाल्या आहेत. पर्यावरण समृद्धीसाठी आज पक्षी वाचणे,गरजेचे आहे.मूळचे दिग्रस तालुक्यातील लायगव्हान येथील मात्र झारखंड येथे ड्युटीवर तैनात असलेले कोब्रा कमांडो गौतम धवने यांनी जंगलात वेदनेने विव्हळत असलेल्या एका जखमी कबुतर जातीच्या पक्ष्याला जीवदान देऊन माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय दिला आहे.
झारखंड राज्यात कोब्रा बटालियनमध्ये कार्यरत असलेले कमांडो गौतम धवने ड्युटीवरून घरी परतत असताना जंगलात त्यांना एक कबुतर वेदनेने तडफडत असल्याचे दिसले.त्यांनी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी त्या पक्ष्याला खाऊपिऊ घातले.मात्र पक्ष्याने प्रतिसाद दिला नाही. धवने यांनी त्या कबुतराला आपल्या खोलीवर आणून सलग तीन दिवस प्रथमोपचार केले.स्वतंत्र खोलीत ठेऊन आणि दाण्यापानाची सोय करून चांगलीच शुश्रूषा केली.त्यामुळे त्या पक्ष्याचा जीव वाचला.सरतेशेवटी धवने यांनी त्या पक्ष्याला जंगलात सुखरूप सोडले.आपल्या ड्युटीच्या ठिकाणी त्यांनी पक्षी पाणपोई देखील उभारली आहे.देशाच्या शत्रूंविरोधात कायम हातात बंदुका असणारे हात पक्ष्यांच्या रक्षणासाठी देखील उठू शकतात,हे गौतम धवने यांच्या कृतीतून दिसून येते.
पक्षीमित्र जय राठोड यांचे पक्ष्यांवरील प्रेम आणि कार्य बघता मी प्रेरित झालो.
एका पक्ष्याला वाचविल्याचे मनस्वी समाधान आहे.खरे तर पक्षीमित्र जय राठोड यांचे पक्ष्यांवरील प्रेम आणि कार्य बघता मी प्रेरित झालो.आणि हीच प्रेरणा घेऊन त्या कबुतराला वाचविण्यात मला यश आले.पक्षी असो वा मनुष्य यांचे जिव वाचविणे,हे आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे.
-गौतम धवने,कोब्रा कमांडो