मांडवी येथे शनिवारी शासकिय सेवा व योजनांचा महा मेळावा ; तालुका प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी
किनवट*,दि.११ : स्वातंत्र्याच्या अम्रत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवी (ता. किनवट) येथे शनिवारी(दि.१३) सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत “शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा”,आयोजित करण्यात आला आहे.या महामेळाव्याची जय्यत तयारी तालुका प्रशासनाने केलेली आहे, अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस.बी.अंभोरे यांनी दिली.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचावी व त्यांचा लाभ जनतेला मिळावा, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या महामेळाव्यात शासनाच्या विविध कार्यालयांचे ७५ स्टाल राहणार आहेत.या स्टालवर त्या त्या कार्यालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने जनतेकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे व पूर्तता करणाऱ्या नागरिकांना त्वरीत लाभही देण्यात येणार आहे. या स्टाल मध्ये किनवट तालुका ग्राहक पंचायतीचा ५८ क्रमांकाचा स्टाल राहणार आहे.तेथे ग्राहकांना त्यांच्या तक्रारी विषयी मार्गदर्शन व सल्ला देण्यात येणार आहे.
यावेळी रक्तदान व मोफत रुग्ण तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.या महामेळाव्यास उपस्थित राहून सर्व योजनांच्या माहीतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.अरविंद चव्हाण, सचिव ॲड.पंकज गावंडे व किनवट तालुका ग्राहक पंचायत या स्वंयसेवी ग्राहक संस्थेचे अध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे व सचिव प्रा.विशाल गिमेकर यांनी केले आहे.