कॅस्ट्रॉल कंपनीच्या नावाने बनावट इंजिन ऑइलची स्टीकर लोगो बनवून विक्री.. सिंदखेड पोलिस ठाण्यात ‘कॉपीराइट’ चा गुन्हा! 42 हजार रुपयांचे बोगस इंजिन ऑईल जप्त.
श्री क्षेत्र माहूर/वि.प्र.पदमा गि-हे
कॅस्ट्रॉल कंपनीचे नावाने बनावट इंजिन ऑइल व कॅस्ट्रॉल कंपनीचेच बनावट स्टीकर,लोगो बारकोड कंपनीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेले इंजिन ऑइल जप्त करून किनवट तालुक्यातील सारखणी येथील चार व वाई बाजार येथील दोन ऑटोमोबाईल्स व टू व्हीलर सर्विसिंग सेंटर चालकांविरुद्ध नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यात दिनांक 19 आॅक्टोबर 2021 रोजी रात्री उशिरा कॅस्ट्रॉल कंपनीचे ऑपरेशन मॅनेजर सतीश चंद्र जाट यांच्या फिर्यादीवरून कॉपीराइट अधिनियमांतील कलमान्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
किनवट तालुक्यातील सारखणी बाजारपेठेत ‘सब कुछ नकली मिलता है’ हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. कापूस सोयाबीन तूर खरेदीच्या वजन काट्यातील मापात पापापासून तर गुलाब जामुन च्या खाव्यात किडे आळ्या अशा अनेक स्वरूपाच्या खाद्यपदार्थातील भेसळ करून विक्री करण्यासाठी सारखणीची व्यापार पेठ नावलौकिक असल्याचे सर्वश्रुत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून कॅस्ट्रॉल या देशातील नामांकित कंपनीच्या नावाने बनावट इंजन ऑइलची विक्री करून वाहन चालकांना बनावट इंजिन ऑइलची विक्री करण्याचा गोरख धंदा सुरू होता.या विभागात खर्याखुर्या कॅस्ट्रॉल कंपनीच्या ऑइलची विक्री मंदावल्याने व उद्दिष्टापेक्षा खप कमी होत असल्याची कारणे शोधण्यासाठी कंपनीचे इन्व्हेस्टीगेटर फैयाज मोहम्मद आलम,हितेंद्र शर्मा व एरिया मॅनेजर संजय भदोरिया यांनी गोपनीय माहिती घेतली असता सारखणी आणि वाई बाजार बाजारपेठेतील ऑटोमोबाईल्स आणि टू व्हीलर सर्विसिंग सेंटर वर सर्रास कॅस्ट्रॉल कंपनी च्या नावाने बनावट इंजिन ऑइल व कॅस्ट्रॉल कंपनीचेच बनावट स्टीकर व लोगो लावून विक्री केले जात असल्याची बाब उघडकीस आली.
◼️42 हजार सहाशे पंचेचाळीस रुपयाचे बनावट कॅस्ट्रॉल इंजिन ऑइल जप्त!
सिंदखेड पोलिसांच्या मदतीने केलेल्या छापेमारीत सारखणी व वाई बाजार येथील सहा ऑटोमोबाईल्स व टू व्हीलर सर्विसिंग सेंटर वर एकूण 42 हजार सहाशे पंचेचाळीस रुपयाचे कॅस्ट्रॉल इंजिन ऑइल चे बनावट डबे बमिळून आले आहेत.त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या आदेशाने गुन्हा नोंद करून या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. काल झालेल्या संयुक्त छापेमारीत पोलीस उपनिरीक्षक श्री. भोपळे, पोलीस नाईक श्री गुव्हाडे,पोलीस कॉन्स्टेबल सोनु सोनसळे व गजानन नंदगावे यांनी चोख कामगिरी बजावली.एकंदरीत कॅस्ट्रॉल कंपनीचे अधिकारी व सिंदखेड पोलिसांनी केलेल्या संयुक्त छापेमारी मुळे खाद्यान्न नामांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू हलक्या दर्जाच्या व बनावट स्वरूपाच्या विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
◼️संयुक्त कारवाईची गरज!
कॅस्ट्रॉल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईच्या धर्तीवर माहूर आणि किनवट तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या व मोठ्या बाजारपेठ असलेल्या सारखणी व वाई बाजार येथे अन्न व औषध प्रशासन,राज्य विक्रीकर विभाग, स्थानिक पोलीस व तसेच खाद्यान्न व चैनीच्या वस्तू उत्पादन करणाऱ्या नामांकित कंपन्यांनी संयुक्तरित्या या दोन्ही बाजारपेठेत तपासणी मोहीम राबविल्यास अनेक वस्तूमधील बनावट पणा उघडकीस येऊन जनतेच्या आरोग्याशी खेळ करून आर्थिक छळ करणाऱ्यांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही.