माजी नगराध्यक्षांचे घर फोडून लाखोंच्या ऐवजासह दागीनेही लंपास,सीसी टिव्हीची हार्ड डिस्कही चोरली
तालुका /प्रतिनिधी :-
किनवटला रेल्वेस्थानक रस्त्यावरील माजी नगराध्यक्ष साजीद खान यांचे कुलूपबंद असलेले घर फोडून एक पिस्तूल, दहा ते बारा तोळे सोने आणि दोन ते तीन लाख रुपये रोख चोरट्यांनी लांबवली. म्हणजे विशेष चोरट्यांनी घरातील सीसीटीव्हीची हार्डडिस्कदेखील चोरून नेली. ही खळबळजनक घटना शनिवारी (ता. नऊ) सकाळी आठ ते दहादरम्यान घडल्याचा अंदाज आहे.
पोलिसांनी सायंकाळी श्वान पथकास पाचारण केले होते; तसेच ठसेतज्ज्ञांचे पथकही दाखल झाले होते. माजी नगराध्यक्ष साजीद खान हे शुक्रवारी (ता. आठ) सायंकाळी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. शनिवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता त्यांना घरी चोरी झाल्याचे कळले. त्यांनी ही माहिती किनवट पोलिसांना दिली. नांदेड येथील श्वान पथक व ठसेतज्ज्ञ पथक सायंकाळी साडेसहाला साजीद खान यांच्या घरी दाखल झाले. आलमारीच्या लॉकरमधील दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने, रोख दोन ते तीन लाख रुपये आणि आठ राउंडची पिस्तूल चोरट्यांनी लांबविल्याचे साजिद खान यांनी पोलिसांना सांगितले. याबाबत किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.