महापालिका आणि तहसीलच्या भ्रष्टाचारी धेंडाना लगाम घालून कारवाई का केली जात नाही? -कॉ. गंगाधर गायकवाड
(आठ महिने उलटूनही पूरग्रस्तांचे नैसर्गिक आपत्तीचे अनुदान वाटपास दिरंगाई,सीटूचे चार महिन्यापासून साखळी उपोषण, सोमवार पासून मनपा समोर आमरण उपोषण)
नांदेड : मस्तमवाल आणि भ्रष्टाचारी धेंडाना सहिसलामत वाचविण्यासाठी महापालिका आणि तहसील कार्यालय पूर्ण ताकतीने प्रयत्नशील आहे.
२६-२७ जुलै च्या अतिवृष्टीचे मंजूर अनुदान आठ महिने उलटूनही पात्र लाभार्थ्यांना अजून मिळाले नाही ही पीडित पूरग्रस्तांची थट्टा नाही काय असा सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव तथा सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रशासनास विचारला आहे.
अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त पीडितांना सानुग्रह अनुदान व रेशन किट मिळावी म्हणून सीटू आणि जमसं ने आतापर्यंत १२८ दिवस जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आणि तहसील कार्यालय,नांदेड समोर साखळी उपोषण केले आहे. बोगस पूरग्रस्तांच्या निधी वाटप मागण्यासह महापालिकेतील विविध घोटाळ्याची सीआयडी व विभागीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे ही मागणी सातत्याने करण्यात येत आहे. परंतु दखल घेण्यात येत नाही.अनुसूचित जातीचे पीडित पूरग्रस्त कॉ.रामदास प्रसराम लोखंडे यांचे वेळेवर उपचारासाठी पैसे मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाला असून ते साखळी उपोषणात सहभागी होते तसेच त्यांनी ६ फेब्रुवारी रोजी प्रशासनास नोटीस देऊन भ्रष्टाचाराच्या गंभीर मागण्या करीत आमरण उपोषणाची नोटीस दिली होती. त्यांच्या निवेदनाची कसल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. अखेर त्यांचा छत्रपती संभाजी नगरहून नांदेड येथे आंदोलनात हजर राहण्यासाठी येत असताना दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यास प्रशासन जबाबदार आहे असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी,नांदेड शहरात पुनर्वसन करावे आणि त्यांचा एक मुलगा जो मनपा मध्ये कंत्राटी सफाई कामगार होता त्यास कायम नोकरी देण्यात यावी.
या मागण्यासाठी टोकाचा निर्णय घेत मनपा मुख्य कार्यालया समोर सीटूच्या वतीने सोमवार तारीख ५ पासून प्रानांतिक अमरण उपोषण सुरु करण्यात येणार आहे.
भ्रष्टाचारी आणि मस्तमवाल अधिकारी कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक वाचवीन्याचा प्रयत्न केला जात असून जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची गरज आहे.मंजूर अनुदान वाटप होत नसल्यामुळे एका पूरग्रस्तांच्या वडिलांना हृदय विकाराचा झटका आला असून विष्णुपुरी येथील शासकीय दवाखान्यात काही दिवस उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.परंतु पृकर्तीमध्ये सुधारणा होत नसल्याने नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात मागील पाच दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांचे दवाखान्याचे बील लाखाच्या जवळपास गेले असून अनुदान मिळालेच तर थोडाफार हाथभार लागेल असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
मनपा आणि तहसील कार्यालयातील मस्तमवाल भ्रष्टाचारी धेंडावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही. तोपर्यंत मनपा समोर आमरण उपोषण सुरु करण्यात येणार आहे.काही मनपा तील कर्मचारी उपोषण कर्त्यांच्या अंगावर येत असून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. होणाऱ्या आमरण उपोषणात कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे आणि कॉ.गणपत गायकवाड आदींचा समावेश असणार आहे तर जमसंच्या महिला धरणे धरून मनपा समोर बसणार आहेत.
माकपाच्या माजी खासदार तथा पॉलिट ब्युरो सदस्या कॉ.वृंदा करात यांनी या प्रकरणी लक्ष वेधले असून केंद्रीय स्तरावर त्या पाठपुरावा करणार असल्याचे कॉ.गायकवाड यांनी कळविले आहे.
=======