कस्टम मुंबई संघाचा मोठा विजय! मुंबई,अमृतसर,पुणे आणि पंजाब पोलीस वरचढ
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.११.स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवार रोजी साखळी सामने खेळविले गेले.कस्टम मुंबई संघाने गोलांचा पाऊस पाडत सामना एकतर्फा जिंकत उपस्थित प्रेक्षकांची मनें जिंकली. तर इतर साखळी सामन्यात एमपीटी मुंबई,एसजीपीस अमृतसर आणि ऑरेंज सिटी नागपुर संघांनी बहारदार खेळाच्या जोरावर आपले सामने सहज जिंकले.
आज सकाळी नऊ वाजता साईं एक्सेलेंसी बिलासपुर सीजी आणि कस्टम मुंबई संघादरम्यान पहिला सामना खेळण्यात आला.कस्टम मुंबई संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत 8 विरुद्ध 1 गोल फरकाने साईं एक्सेलेंसी बिलासपुर संघाचा दारुण पराभव केला.आमीद खान पठान आणि धर्मवीर यादव यांनी संघासाठी दोन – दोन गोल केले.तसेच तेजस चव्हाण, आदित्य लालगे, इक्तिदर इशरित यांनी प्रत्येकी एक गोल केले. तर बिलासपुर संघाने सय्यद समीर अली मार्फत एक गोल केले.
दुसऱ्या सामन्यात एमपीटी मुंबई संघाने 3 विरुद्ध 0 गोल अंतराने इटावा हॉस्टल सैफई यू. पी. संघाला नमविले. मुंबई तर्फे सागर सिंघाडे, मयूर धनावडे आणि हरीश शिंदगी याने प्रत्येकी एक गोल केले.
आजचा तीसरा सामना शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी अमृतसर आणि खालसा युथ क्लब नांदेड संघादरम्यान खेळविण्यात आला. एसजीपीसी अमृतसर संघाने संघर्षपूर्ण सामन्यात 2 विरुद्ध 1 गोल अंतराने हा सामना जिंकला. वरील सामन्यात यूथ खालसा क्लब संघाने खेळाच्या 40 व्या मिनिटाला गोल केले. जर्सी क्रमांक 5 रामूने मैदानी गोल करत आघाडी मिळवून दिली होती.खेळाच्या चौथ्या क्वार्टर मध्ये अमृतसर संघाने आक्रमक खेळ कौशल्य दाखवत 52 व्या आणि 59 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मध्ये गोल करत सामना जिंकला. दोन्ही गोल जुगराजसिंघ याने केले.
चौथ्या सामन्यात ऑरेंज सिटी नागपुर संघाने चार साहिबजादे हॉकी अकाडेमी नांदेड संघाचा 5 विरुद्ध 2 गोल असा पराभव केला. नागपुरच्या प्रज्वल वानखेडे यांने पेनल्टी कॉर्नर मध्ये दोन गोल केले.तसेच इरशाद मिर्जा,प्रशांत तोडकर, साकिब रहीम,मोहमद अफान खान याने प्रत्येकी एक गोल केले.चार साहिबजादा अकाडेमी तर्फे हरविंदर सिंघ हजुरिया (बिंदर) याने मैदानी आणि सिमरनजीतसिंघ याने पेनल्टी कॉर्नर मध्ये गोल करत उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.
आजचा पाचवा व शेवटचा हॉकी सामना सेंट्रल रेलवे डिवीजन पुणे आणि पंजाब पोलीस संघादरम्यान अनिर्णीत राहिला. दोन्ही संघात अतिटतिचा सामना रंगला होता.
पंजाब पोलीस संघाने खेळाच्या दुसऱ्या मिनिटलाच पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोल मध्ये केले. सिमरनजीतसिंघने गोल नोंदविला.11 व्या मिनिटाला वरिंदरसिंघ याने पुन्हा गोल करत पंजाब पोलीस संघाला आघाडी मिळवून दिली.पण रेलवे पुणे संघाने खेळाच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात गोल करून सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. पुणे संघातर्फे कर्णधार विनीत कांबळे आणि करण चौहान यांनी गोल केले.
आजच्या विविध सामन्यात पंच म्हणून अय्याज हनीफ खान, कारणदीप सिंघ,इन्दरपालसिंघ आणि गुरमीतसिंघ यांनी कामगिरी पार पाडली. तर तांत्रिक पंच म्हणून प्रिन्ससिंघ, अश्विनी कुमार,आणि सोनू यांनी काम पाहिले.आयोजन समिति अध्यक्ष माजी नगरसेवक गुरमीतसिंघ नवाब आणि त्यांच्या चमुनी सामन्याँचे संचालन केले.अशी माहिती
रविंद्रसिंघ मोदी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.