मराठा आरक्षणसाठी झालेल्या आत्महत्यांमुळे यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीः अशोक चव्हाण
नांदेड, दि.२४ ऑक्टोबर २०२३:
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन त्यासाठी झालेल्या आत्महत्या आणि लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन यंदा आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केले आहे. वाढदिवशी कोणीही हार-गुच्छ घेऊन शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
देगाव-येळेगाव, जि. नांदेड येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी आपल्या भाषणात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नुकत्याच झालेल्या आत्महत्या आणि आरक्षणासंदर्भात लोकांच्या भावना लक्षात घेऊन यावर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही. मुळात मी वाढदिवस साजराच करत नाही.मात्र, दरवर्षी लोक भेटायला येतात. त्यांच्या इच्छेचा मान ठेवावा लागतो. यंदा कोणीही गुच्छ वगैरे घेऊन येऊ नये, ही विनंती. यावर्षी मी वाढदिवसाचा हार किंवा स्वागत स्वीकारणार नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरूण मुलांनी केलेल्या आत्महत्या वेदनादायी आहेत. सर्वांना त्याचे तीव्र दुःख आहे आणि अशा प्रसंगात वाढदिवस साजरा करणे माझ्या मनाला पटणारे नाही. त्याचप्रमाणे कोणीही वाढदिवसाचे फलक लावू नयेत, असे आवाहन देखील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.